पान एक-सिंधुदुर्गात भूजल पातळी टिकून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-सिंधुदुर्गात भूजल पातळी टिकून
पान एक-सिंधुदुर्गात भूजल पातळी टिकून

पान एक-सिंधुदुर्गात भूजल पातळी टिकून

sakal_logo
By

सिंधुदुर्गात भूजल पातळी टिकून
---
सलग पाचव्या वर्षी स्थिती; यंदा टंचाईचे सावट दूरच
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः जिल्ह्यात यंदा सलग पाचव्या वर्षी पाणी पातळी टिकून आहे. यंदा ती ६.०८ मीटर असून, हे प्रमाण समाधानकारक मानले जाते. यामुळे यंदाही जिल्ह्याला टंचाईच्या झळा बसणार नाहीत.
भरपूर पाऊस, जिल्हा परिषदेचा कच्चे व वनराई बंधारे यशस्वी प्रयोग यामुळे पाच वर्षे पाणी पातळी टिकून आहे. जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी देण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे जिल्हा टंचाई मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात यावर्षी सरासरी तीन हजार ४०० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्हा परिषदेने हजारो कच्चे बंधारे बांधून दरवर्षी वाहून जाणारे पाणी अडविले. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत झाली. यंदा जिल्हा परिषदेने चार हजारहून अधिक कच्चे व वनराई बंधारे बांधले. परिणामी, पाण्याचे स्रोत बळकट झाले. जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल, मेमध्ये काही भागांत टंचाई निर्माण होते. यावर्षी फेब्रुवारीअखेर भूगर्भातील पाणीपातळी ६.०८ मीटर अशी टिकून आहे. हे प्रमाण भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले. गेल्या पाच वर्षांत फेब्रुवारी अखेरपर्यंतचे भूजल प्रमाण समाधानकारक राहिले आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण ६.२६, २०१८ मध्ये ६.१०, २०१९ मध्ये ६.३८, २०२० मध्ये ६.१६, २०२१ मध्ये ६.१७, २०२२ मध्ये ६.०५ मीटर इतके होते. ही समाधानकारक स्थिती आहे, असे जिल्हा भूजल सर्वेक्षणचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात दरवर्षी टंचाई समस्येपोटी जिल्हा परिषद कोट्यवधींचे टंचाई आराखडे करते. २०१८-१९ मध्ये चार गावे ५५१ वाड्यांसाठी सहा कोटी ६४ लाखांचा, तर २०१९-२० मध्ये ११ गावे ६४१ वाड्यांसाठी सात कोटी ३६ लाखांचा, तसेच २०२०-२१ मध्ये आठ गावे ६२६ वाड्यांसाठी सहा कोटी ४० लाखांचा आराखडा होता. मात्र, टंचाई नसल्याने टंचाई निवारणार्थ कामे झाली नाहीत. गेल्या वर्षी २०२१-२२ मध्ये सूचना देऊनही एकाही तालुक्यातून टंचाई आराखडा आला नाही. यंदाही तीच स्थिती आहे. संबंधित तालुक्यात टंचाईची शक्‍यता नसल्याने व मागणी पत्र नसल्याने जिल्ह्याचा संभाव्य टंचाई आराखडा बनविण्यात आला नसल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली.

‘जलजीवन’ने स्थिती आणखी सुधारली
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोठेही संभाव्य टंचाईची शक्यता नाही. ‘जलजीवन’चे काम सुरू असून, योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी पोचविण्याचे प्रयत्न आहेत. ही योजना गावोगाव कार्यान्वित झाल्यावर टंचाईचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल.

टंचाईची शक्यता दिसेल, तेथे ‘जलजीवन’चे काम प्राधान्याने सुरू करण्याच्या लेखी सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- उदयकुमार महाजनी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, सिंधुदुर्ग