रत्नागिरी-शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांची पोपटपंची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांची पोपटपंची
रत्नागिरी-शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांची पोपटपंची

रत्नागिरी-शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांची पोपटपंची

sakal_logo
By

८८२०८


लोकसभेपूर्वी विधानसभा निवडणूक

खासदार तटकरे; मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांची पोपटपंची सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांची सध्या पोपटपंची सुरू आहे. आयती संधी मिळाल्याने त्या प्रवक्त्यांचा आवाज दिवसेंदिवस वाढत आहे. शरद पवारांनी शिवसेना फोडली, अशी टिपण्णी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. आधी आपण आमदार कोणामुळे झालात हे सांगा, आरशात चेहरा बघून सांगा की पक्ष कोणी फोडला, अशी अशी बोचरी टीका दीपक केसरकर यांचे नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांनी केली. अर्थसंकल्प म्हणजे लोकसभेपूर्वी विधानसभेच्या निवडणुका घेण्याची तयारी दिसते. हा अर्थसंकल्प या सरकारचा शेवटचा असू शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दिशा समितीच्या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलते होते.
ते म्हणाले, ‘‘कोणी कितीही बंडखोरी करू दे, महाराष्ट्रात परिवर्तन अटळ आहे. याची सुरुवात भाजपच्याच बालेकिल्ल्यातून झाली आहे. कसब्याचा निकाल हा भाजप विरोधात जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया दाखवणारा आहे. एका विजयाने आम्ही हुरळून जात नाही. मात्र आगामी निवडणुकीत जनताच भाजपला आरसा दाखवणार आहे. अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे; परंतु या योजनांसाठी आर्थिक तरतूद काय ते आधी दाखवा. त्यामुळे हा चुकीचा अर्थसंकल्प आहे. लोकसभेपूर्वी विधानसभेच्या निवडणूका घेण्याची ही तयारी दिसते. कदाचित हा अर्थसंकल्प या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असू शकेल. आमच्याकडे होते तेव्हा आवाज एकदम बारीक होता. आता त्यांचा आवाज वाढला आहे. स्वयंघोषित प्रवक्त्यांची पोपटपंची सुरू झाली आहे.’’
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, बाप्पा सावंत, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे आदी उपस्थित होते.


मुंबईत १५ मार्चला
आघाडीची बैठक
आगामी निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे राज्यात धोरण निश्चित झाले आहे. प्रमुख तीन पक्ष आणि सोबत येणारे इतर घटक पक्ष यांना घेऊन सर्वच निवडणूका एकत्रित लढणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे, ज्याच्यामध्ये निवडुन येण्याची क्षमता आहे, अशा उमेदवाराचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी १५ मार्चला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची एकत्रित बैठक मुंबईत होणार आहे. विभागवार महाविकास आघाडीचे मेळावे होणार आहेत. कोकणात मेळावा नव्हता. मात्र आम्ही त्यासाठी आग्रही असून कोकणातदेखील महाविकास आघाडीचा जाहीर मेळावा घेण्यात येणार आहे.


पक्षांतरानंतर कदमांनी
दक्षता घ्यावी
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या पक्षांतरावर बोलताना तटकरे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी म्हणून आम्हाला एकहाती विजय मिळवायचा आहे. त्यामुळे आमच्यात एकमत आहे. पक्षांतर करताना प्रत्येकाने घटक पक्षात कटुता येणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या वक्तव्यामुळे कटुता निर्माण होऊ नये. एखादे भाष्य करताना विचारपूर्वक भाष्य करण्याची गरज आहे, असा सल्ला खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.