आरोसमध्ये आंबा, काजू बागा खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोसमध्ये आंबा, काजू बागा खाक
आरोसमध्ये आंबा, काजू बागा खाक

आरोसमध्ये आंबा, काजू बागा खाक

sakal_logo
By

88257
आरोस ः येथे शुक्रवारी आगीत जळून खाक झालेली काजू बाग. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

आरोसमध्ये आंबा, काजू बागा खाक
५० एकरवर आग; चार ते पाच कोटींची हानी, पंचनामे, भरपाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः आंबा व काजू बागायतीमध्ये आगीचे सत्र सुरू असून आरोस-कळंगुटकरवाडी येथे सुमारे ४० ते ५० एकरवरील काजू व आंबा बागायती जळून खाक झाल्या. जवळपास २९२० काजू कलमे व १५ आंबा कलमे जळाल्याने सुमारे चार ते पाच कोटींचे नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
आरोस-कळंगुटकरवाडी येथील शेतकऱ्यांनी कर्ज काढून आंबा काजू बागायती तयार केल्या. चार-पाच वर्षे वावरल्याने उत्पन्न देणारी काजू कलमे आशादायी ठरली होती; परंतु, वणव्यात सर्व कलमे जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत व कष्ट वाया गेले. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली; परंतु, दुपारची वेळ असल्याने आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. तरीसुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवल्याने ग्रामस्थांना यश आले व आग आटोक्यात आली. ४० ते ५० एकरवरील काजू बागायती व आंबा बागायती जळाल्याने आमचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकरी उदय कुबल, झिलू कुबल, कृष्णा कुबल, सखाराम सावंत, दत्तगुरु दळवी, रामचंद्र कासले, राजाराम दळवी, गुंडू कळंगुटकर, दत्तगुरु कुबल, बाबूराव कळंगुटकर, विलास कळंगुटकर, रमाकांत कळंगुटकर, भिवनेश कळंगुटकर, नर्मदा कोरगावकर, भरत कळंगुटकर, सावित्री कळंगुटकर, सिताराम कळंगुटकर, पांडुरंग कळंगुटकर, सुभाष कळंगुटकर, नामदेव कळंगुटकर, मोहन कळंगुटकर, अनिल कळंगुटकर, गजानन नाईक, शांताराम कुबल आदी शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या.
आरोस सरपंच शंकर नाईक यांनी पाहणी केली. सुमारे ५० एकरवर लागलेल्या आगीत गावातील अनेक शेतकऱ्यांचे एकत्रित अंदाजे चार ते पाच कोटींवर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने तत्काळ दखल घेत पंचनामा करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.