
सरिता मुननकर यांचा सावंतवाडीत सत्कार
88135
सावंतवाडी ः येथे सरिता सुरेश मुननकर यांचा सन्मान करताना मान्यवर.
सरिता मुननकर यांचा
सावंतवाडीत सत्कार
बांदा ः सावंतवाडी तालुका भंडारी महिला मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी-भटवाडी येथील निवृत्त केंद्रप्रमुख सरिता मुननकर यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या निवृत्त लिपिक हेमा देसाई, भंडारी मंडळाच्या महिला अध्यक्षा शीतल नाईक, महिला वसतिगृहाच्या अध्यक्षा वैशाली पटेकर, माजी अध्यक्षा समता सूर्याजी आदी उपस्थित होत्या. श्रीमती मुननकर यांनी वेंगुर्ले-परुळे बाजार, शारदा विद्यालय तुळस, सावंतवाडी-माडखोल नं. १, सातूळी नं. १, कोलगाव निरुखे, होडावडे भोज, कारीवडे नं. १ येथे ज्ञानदान केले. जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन सिंधुदुर्ग या संघटनेच्या कार्यकरिणीवर निवड झाली. त्यांच्या या दैदिप्यमान यशस्वी वाटचालीची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
------------
88136
बांदा ः येथे शंभरी पार आजींचा सत्कार करताना बांदा पतंजली योग समितीचे साधक. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)
शंभरी पार आजींचा बांदा येथे सत्कार
बांदा ः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बांदा पतंजली योग समिती मार्फत ‘शंभरी पार महिलांचा सत्कार’, हा उपक्रम राबविण्यात आला. सीताबाई वासुदेव गवस (रा. नेतर्डे-गावठणवाडी), लिलावती वासुदेव कुडव (रा. लकरकोट पत्रादेवी रोड), लिलावती शिवराम कळंगुटकर (रा. बांदा-सटमटवाडी) या तीन महिलांचा औक्षण करून व साडी, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. गतवर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी योगवर्गातील सर्व साधक बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या. शंभरी पार केलेल्या सर्व महिलांच्या घरी जाऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी पतंजली योग समितीचे अध्यक्ष शेखर बांदेकर आदी उपस्थित होते.