
शासकीय योजनांचा लाभ घ्या
88334
वेंगुर्ले ः बचतगट स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करताना प्रज्ञा परब. शेजारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, प्रा. धनश्री पाटील, संगीता कुबल आदी.
शासकीय योजनांचा लाभ घ्या
प्रज्ञा परब; वेंगुर्लेत स्वयंसहाय्यता महिला बचतगट स्नेहमेळा
वेंगुर्ले, ता. ११ ः येथील पालिका राबवित असलेल्या शासनाच्या योजनांच्या अनुषंगाने महिला बचतगटांनी विविध व्यवसाय करावेत. महिलांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेऊन सक्षम बनावे, असे प्रतिपादन महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी पालिकेमार्फत आयोजित महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या स्नेहमेळाव्यात केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील पालिकेच्या कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुद्देशीय सभागृहात आयोजित महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या स्नेहमेळावाचे उद्घाटन संचालिका प्रज्ञा परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी व्यासपीठावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रा. धनश्री पाटील, पालिका प्रशासकिय अधिकारी संगीता कुबल आदी उपस्थित होते.
डॉ.माईणकर यांनी महिलांना आरोग्यविषयक शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती देत महिलांनी वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या प्रज्ञा परब, प्रा. धनश्री पाटील यांनी उदयोगांतील संधी आणि साध्य याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सानिया आंगचेकर, संस्कृती गावडे, स्नेहा नार्वेकर, पूजा धुरी, नीरजा मडकर, फाल्गुनी नार्वेकर यांचा सत्कार झाला. प्रा. धनश्री पाटील यांना पालिकेमार्फत ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानित केले. पालिकेच्या माध्यमातून आयोजित ‘कचऱ्यातून कल्पकता’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला. भटवाडी पूर्ण प्राथमिक शाळा नं. २ च्या मुलांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ विषयावर पथनाट्य सादर केले. बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदीवर पथनाट्य सादर केले. पालिकेने बचतगटांच्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांची कला सादर करण्यासाठी एक मंच दिल्याने महिलांनी बचतगटांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्याचा आनंद घेतला. याबाबत पालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले. महिला स्वयंसहाय्यता बचतगटामार्फत प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, विलास ठुंबरे, अतुल अडसूळ व मनाली परब यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कुबल, शिवानी ताम्हणेकर यांनी केले. पालिका मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.