
मुणगेत शिमगोत्सव उत्साहात
88340
मुणगे ः रोंबाट सादर करताना ग्रामस्थ. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)
मुणगेत शिमगोत्सव उत्साहात
रोंबाट, तमाशासह इतर कार्यक्रमांनी रंगत
मुणगे, ता. ११ ः येथील भगवती मंदिरात पाच दिवसांचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. येथील भगवती मंदिरात शिमगोत्सवाला होळी उत्सवाने सुरुवात झाली.
बांबरवाडी येथून पोफळीच्या झाडाची होळी आणण्यात आली. होळी आणण्यासाठी देवस्थान समितीचे पदाधिकारी, बारापाच मानकरी, ग्रामस्थ जाऊन बांबरवाडी येथून ढोल-ताशांच्या गजरात ‘होळ दे होळ दे होळ दे’ अशा घोषणांच्या तालात होळी भगवती मंदिर येथे आणली. आंब्याची पाने बांधून सायंकाळी वाजतगाजत होळी उभी केली. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कवळ पेटविल्यावर होळीची विधीवत पूजा गुरव यांनी केली. होळीजवळ आकार ठेवून पूजा झाल्यावर नैवेद्य दाखविण्यात आला. गावघराचे गाऱ्हाणे घालण्यात आले. होळीजवळ नारळ ठेवून गाऱ्हाणी घालण्यात आली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री मंदिरात व होळीजवळ कारिवणेवाडी, बांबरवाडी व लब्देवाडी, भंडारवाडी या मंडळांची रोंबाट खेळ व नाचगाणी झाली. तिसऱ्या दिवशी बुधवारपासून गावात खेळे खेळण्यास सुरुवात झाली. कारिवणेवाडी मंडळाचे दशावतारी नाटक झाले. चौथ्या दिवशी गुरुवारी रात्री रोंबाट खेळ, नाचगाणी, लब्देवाडी मंडळाचा तमाशा झाला. पाचव्या दिवशी देवीच्या सभामंडपात नाचगाणी करून आरती, गुलाल उधळणीने धुळवड साजरी करण्यात आली. यात महिलांसह आबालवृद्धांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. ‘देवस्थान’चे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, विश्वस्त पुरुषोत्तम तेली, वसंत शेट्ये, रामचंद्र मुणगेकर, आनंद घाडी, मनोहर बाबू मुणगेकर, अनिल धुवाळी, कृष्णा सावंत, दिलीपकुमार महाजन आदी उपस्थित होते.