
कुडाळ एमआयडीसीत आज व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा
88369
किरण हणमशेठ
कुडाळ एमआयडीसीत आज
व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा
कुडाळ, ता. ११ ः श्री गणेश स्वामी कलादालन कुडाळ एमआयडीसी येथे उद्या (ता. १२) सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान बेळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार किरण हणमशेठ यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिचित्र (पोट्रेट) प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी कला तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी, पालक व कला रसिकांनी घ्यावा, असे आवाहन चित्रकार रजनीकांत कदम यांनी केले.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, चित्रकला क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या जिल्ह्यातील मुलांना कला क्षेत्रातील विविध विषयांची माहिती प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाद्वारे व्हावी, यासाठी श्री गणेश स्वामी कलादालनातर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पहिली व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा उद्या आयोजित केली आहे. यावेळी केबीके चित्रमंदिर ट्रस्टचे संचालक जयवंत नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, कलामहर्षी (कै.) के. बी. कुलकर्णी यांचे नातू शिरिष कुलकर्णी, चित्रकार अनिल कुबल (मुंबई), पत्रकार संघा जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, पी. के. सावंत पतसंस्था अध्यक्ष प्रसाद रेगे, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोशिएशन अध्यक्ष मोहन होडावडेकर, पत्रकार समिती तालुकाध्यक्ष विजय पालकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, पत्रकार समिती सचिव व नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, चित्रकार अनिल आचरेकर (मुंबई) आदी उपस्थित राहणार आहेत. किरण हणमशेठ हे चित्रकार (कै.) के. बी. कुलकर्णी यांचे शिष्य असून कोल्हापूर-शिणोली येथील जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट येथे प्राध्यापक आहेत.