
रत्नागिरी - समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्यावर काँक्रिटचा रस्ता
rat११p३०.jpg-
88413
रत्नागिरी ः राजिवडा ते मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील या बंधाऱ्यावर नरिमन पॉइंटच्या धर्तीवर काँक्रिटचा रस्ता होणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील बंधाऱ्यावर काँक्रिटचा रस्ता
---
नरिमन पॉइंटचे मॉडेल; सात कोटींचा प्रकल्प, रोजगाराच्या संधी
रत्नागिरी, ता. ११ ः शहरातील राजिवडा, खडपेवठार, चवंडेवठार ते मांडवीपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील बंधाऱ्यावर काँक्रिटच्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. सुमारे सात कोटींचा हा रस्ता असून, मुंबईतील नरिमन पॉइंटवर फिरण्यासारखे समाधान मिळेल. त्यामुळे पर्यटनात वाढ होणार असून, लहान-मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुशांत ऊर्फ मुन्ना चवंडे यानी दिली.
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवली आहे. राजिवडा ते मांडवी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर काँक्रिटचा रस्ता करण्याची पणन विभागाकडील जॉब प्लेट बनली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामाला मंजुरी मिळाली असल्याचे पणन विभागाकडून सांगण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मुन्ना चवंडे दोन वर्षांपासून या कामासाठी पाठपुरावा करीत होते. तीन महिन्यांपूर्वी याच मागणीचे पत्र तालुकाध्यक्ष चवंडे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांना दिले. त्यानंतर आता हे काम मार्गी लागण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पात या कामाला मंजुरी मिळाल्यावर आता कामाचे अंदाजपत्रक होऊन त्याला तांत्रिक मान्यता मिळाल्यावर निविदा प्रक्रिया होईल. किनारी भाग असला, तरी राजिवडा, खडपेवठार, चवंडेवठारला लागून असलेला समुद्रकिनारा आकर्षक आहे. तरी तेथे म्हणावे तसे पर्यटन विकसित झालेले नाही. आता बंधाऱ्यावर काँक्रिटचा रस्ता झाल्यावर पर्यटकांना आकर्षण वाढून या ठिकाणी पर्यटन आणि रोजगारनिर्मितीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
-------------
चौकट
अग्निशामक बंबांसाठीही मार्ग
राजिवडा ते मांडवी समुद्रकिनाऱ्यालगत अनेक घरे आहेत. या घरांच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडीझुडपाला आग लागण्याचे प्रकार घडत असतात. गेल्या महिन्यात तीन वेळा सुकलेल्या झाडीला आग लागली होती. रत्नागिरी पालिकेचा अग्निशामक बंब जाण्यासाठी तेथे मार्ग नसल्याने तो समुद्रकिनाऱ्यावरून न्यावा लागतो. बंब किनाऱ्यावरील वाळूत रुतण्याचे प्रकारही घडले आहेत. बंधाऱ्यावर काँक्रिटचा रस्ता झाल्यावर हा धोका कमी होणार असून, घरांचे आगीपासून संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे.
००००
० बंधाऱ्याची लांबी- १.५ कि.मी.
० बंधाऱ्यावरील रस्ता- ८ फूट
० खर्च- ७ कोटी