
...तर भ्रष्ट अधिकारी निलंबित
88438
कुडाळ ः येथील शिवसेना शाखा येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर. शेजारी आमदार रवींद्र फाटक, ब्रिगेडियर सुधीर सावंत. (छायाचित्र ः अजय सावंत)
...तर भ्रष्ट अधिकारी निलंबित
दीपक केसरकर; नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा जिल्ह्यात उभारणार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी काम करण्यासाठी एक जरी रुपया मागितला तरी त्याचे तत्काळ निलंबन केले जाईल. तसे परिपत्रकच काढले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
जिल्ह्यात नेताजी सुभाषचंद्र बोस ही शाळा सुरू होत आहे. त्या शाळेमध्ये ५०० मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यात दुर्गम भागातील मुलांना या शाळेत प्रवेश दिला जाईल. शिवाय प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेची एक एक मॉर्डन शाळाही होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
येथील शिवसेना शाखा येथे आज शिक्षणमंत्री केसरकर पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर आदी उपस्थित होते.
या वेळी केसरकर म्हणाले, ‘‘शाळकरी मुलांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील त्यासाठी आपले प्रयत्न आहेत. आता सर्व मुलांना युनिफॉर्म देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शुज, सॅग तसेच पुस्तकांसोबत वह्या (तिसरी ते आठवी पर्यंत) मुलांना दिल्या जातील. आता आपला सिंधुदुर्ग जिल्हा आदर्श म्हणुन उभा राहणार आहे. आताच झालेल्या अर्थसंकल्पात कोकणाला झुकते माप देण्यात आले आहे. राज्यभरात ७५ हजार नोकर भरतीचा कार्यक्रम घेतला आहे. त्यात ३० हजार शिक्षकांची पदे अंतर्भुत आहेत. मच्छिमाऱ्यांसाठीही १३ हजार कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांसाठीही भरीव तरतूद केली असून दुर्लक्षित अशा सर्व समाजांसाठी महामंडळे स्थापन करून त्यांना दिलासा दिला आहे.’’ या वेळी श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत काही महिला कार्यकर्ता शिवसेना पक्षात प्रवेश झाला.
----
चौकट
सिंधुदुर्गात संघटना जोमाने वाढविणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री केसरकर व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्यावर पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी आपले काम सुरू होणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत यासर्व निवडणुका दरम्यान पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे आमदार तथा पक्ष निरीक्षक फाटक यांनी सांगितले.