
ठाकरेंनी खोक्यांचा पुन्हा आरोप करताना विचार करावा
88459
सावंतवाडी ः येथे शनिवारी आयोजित मेळाव्यात बोलताना दीपक केसरकर. व्यासपीठावर रवींद्र फाटक, अशोक दळवी, अनारोजीन लोबो आदी.
ठाकरेंनी खोक्यांचा पुन्हा
आरोप करताना विचार करावा
केसरकर ः टीकात्मक स्लोगनचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः माझ्यावर कोणी कितीही खोक्यांचे आरोप केले, तसेच गद्दार म्हटले तरी त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ती त्यांची संस्कृती आहे. आम्ही गद्दारी केली नाही किंवा कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. उलट स्वतःची प्रॉपर्टी विकून पक्षवाढीसाठी काम केले आहे. माझ्यावर पुन्हा खोके घेतल्याचा आरोप करताना ठाकरे पिता-पुत्रांनी विचार करावा; अन्यथा मी असे स्लोगन तयार करेन की तुम्ही महाराष्ट्रात पुन्हा डोकं वर काढू शकणार नाही, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला.
आम्ही कोणीही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितले नव्हते. त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडावी, हीच आमची मागणी होती; मात्र आमदार-खासदारांपेक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार जवळचे वाटल्यामुळेच त्यांची अधोगती झाली, असाही टोला केसरकर यांनी लगावला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात केसरकर बोलत होते. या वेळी श्री. फाटक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी नगरसेविका अनारोजिन लोबो, भारती मोरे उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘ठाकरे गटानेच खरी गद्दारी केली होती. येथील जनतेने भाजप शिवसेनेच्या सत्तेला मतदान केले होते; मात्र स्वार्थापोटी ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आम्हा शिवसेना आमदारावर वारंवार अन्याय होऊ लागल्याने आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडण्याची मागणी केली होती; मात्र आपल्या आमदार-खासदारांपेक्षा त्यांना गांधी आणि पवारच जवळचे वाटले. त्यामुळे त्यांची सद्यस्थितीतील अधोगती झाली आहे. मी शिवसेनेत येण्यापूर्वी सिंधुदुर्ग पक्षाला चाळीस हजार एवढे मतदान होते; मात्र मी आल्यानंतर ते एक लाख पन्नास हजार एवढे वाढले. ही ताकद मला माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे मिळाली आहे.’’
ते म्हणाले, “कोकणात रोजगार निर्मितीसाठी मी काजू धोरणाचा मुद्दा तत्कालीन मंत्रिमंडळात ठेवला होता; मात्र मुख्यमंत्र्यांना नेमके काजू म्हणजे काय? आणि त्यापासून किती व्यवसाय बनू शकतात, हेच कळले नसल्याने त्यांनी हा मुद्दा हसण्यावारी नेला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ते रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा हसले होते. त्याचा व्हिडिओ कोकणवासीयांना दाखवला पाहिजे. हा अपमान कोकणवासीयांचा आहे.’’
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरेंची तब्येत मध्ये मध्ये बरी नसते हे आम्ही मान्य करू शकतो. पण त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे २८ वर्षांचे तरुण असताना देखील त्यांनी अडीच वर्षांत काय केले? ते स्वतःच्या कधी कार्यालयात गेले नाहीत. घरात बसून पक्ष आणि संघटना वाढत नसते.’’
फाटक म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील शिवसेनेची संघटना पुन्हा एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रयत्न करणार आहे.” त्यानंतर सावंतवाडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश केला. केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले.
ठाकरेंनी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीला विकला
केसरकर म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचा मी आमदार असताना देखील या ठिकाणी जयंत पाटील एक महिला उमेदवार घेऊन राष्ट्रवादीचे भावी आमदार असा प्रचार करून गेले. हा आपल्या पक्षाच्या आमदारावर होणारा अन्याय त्यावेळी उद्धव ठाकरेंना दिसला नव्हता का? ठाकरेंचा सध्याचा पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीने विकत घेतला आहे.’’