
हत्तीप्रश्नाबाबत वनमंत्री बैठक घेणार
88461
मुंबई ः हत्तीप्रश्नाबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देताना राजन तेली, सुधीर दळवी, यशवंत आठलेकर.
हत्तीप्रश्नाबाबत वनमंत्री बैठक घेणार
राजन तेली; कायमस्वरुपी तोडगा काढणार
दोडामार्ग, ता. ११ ः तिराळी खोऱ्यात हैदोस घालीत असलेल्या हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी बैठक बोलावण्याच्या मागणीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. हत्ती प्रश्नाबाबत त्वरित बैठक लावण्याच्या सूचना वनमंत्र्यानी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
तिराळी खोऱ्यात दशक्रोशीतील गावात हत्तींकडून शेत-बागायतींचे अतोनात नुकसान सत्र सुरू आहे. नुकसानग्रस्त गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी ३१ मार्चपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास वन विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या खोऱ्यात २२ वर्षांपासून रानटी हत्तींचा उपद्रव सुरू आहे. शासनाकडून हत्तींना हुसकावून लावण्यासाठी सर्व उपाययोजना कूचकामी ठरल्या आहेत. सध्या या हत्तींमुळे काजू गोळा करण्यासाठी बागायतींमध्ये जाणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तत्काळ उपायोजना करून तिलारी तसेच सिंधुदुर्गमधील इतर गावांमध्ये होणारा हत्तीचा त्रास कमी करण्यासाठी आपल्या दालनात वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून उपाययोजना काढाव्यात व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तेली यांनी केली होती. याबाबतचे निवेदन वनमंत्री मुनगंटीवार यांना त्यांनी दिले होते. यावेळी यशवंत आठलेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी उपस्थित होते. वनमंत्री मुनगंटीवार यांनी या निवेदनाची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी याप्रश्नी त्वरित बैठक बोलविण्याबाबतच्या सूचना व तसा शेरा दिलेल्या निवेदनावर मारल्याची माहिती तेली यांनी दिली.