
मालवणात उद्या विविध कार्यक्रम
मालवणात उद्या विविध कार्यक्रम
मालवण : शहरातील मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव व शिमगोत्सवाचे सोमवारी (ता. १३) आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळपासून पूजाअर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे, रात्री ९ वाजता पारंपरिक घुमट वादन, कलावंतीण नृत्य व गीत सादरीकरण होणार आहे. त्यानंतर कलांकुर ग्रुप मालवण यांचा ‘मराठमोळा नजराणा’, हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये ‘सायलेंस... खटला चालू आहे’, हे नाटक व नृत्ये सादर होणार आहेत. स्थानिक कलाकारांचे नृत्यविष्कारही सादर होणार आहेत. मांड उत्सवानिमित्त १५ ला वाडवळ कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाने केले आहे.
................
पणजी-वेंगुर्ले बस पूर्ववतची मागणी
सावंतवाडी ः पणजी-कदंबा बसस्थानकावरून सायंकाळी मार्गस्थ करण्यात येणारी पणजी-वेंगुर्ले एसटी फेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. वेंगुर्ले एसटी आगाराची पणजी-कदंबा बसस्थानकावरून सायंकाळी ६.४० ला मार्गस्थ करण्यात येणारी पणजी-वेंगुर्ले एसटी तीन वर्षांपासून बंद आहे. अधिकाऱ्यांकडून पणजी-वेंगुर्ले एसटी फेरी रोज सुरू ठेवण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही बस बंद असल्याने गोवा राज्यातून मळेवाड, शिरोडा, वेंगुर्ले या ठिकाणी उशिरा येणाऱ्या प्रवासी विद्यार्थ्यांची रुग्णांची गैरसोय होत आहे. खासगी वाहनाने प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सायंकाळची पणजी-वेंगुर्ले बस पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.