पाऊलखुणा

पाऊलखुणा

पाऊलखुणा ः भाग - ११२

88479
सावंतवाडीतील स्वागत समारंभ प्रसंगी श्रीमंत शिवरामराजे भोसले (राजेसाहेब), राणीसाहेब सत्वशिलादेवी भोसले यांच्या समवेत हेमलताराजे, सुनिताराजे व सत्यवतीराजे.


शिवरामराजेंचा शाही विवाह सोहळा

लीड
सावंतवाडी संस्थानचे अधिपती श्रीमंत शिवरामराजे यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे त्यांचा विवाह सोहळा. त्यांच्या विवाहामुळे बडोदा येथील गायकवाड घराण्याशी सावंतवाडी संस्थानचा ऋणानुबंध पुन्हा एकदा जुळला. त्या घराण्यातील राजकन्या सरलाराजे या राजेसाहेबांच्या जीवनसाथी बनल्या.
------------------
श्रीमंत शिवरामराजे यांच्या विवाहानंतर बडोदा घराण्याशी सावंतवाडीच्या राजपरिवाराचा तिसऱ्यांदा ऋणानुबंध जुळला. सगळ्यात आधी ताराबाईसाहेब, नंतर श्रीमंत पार्वतीदेवी व त्यानंतर राजकन्या सरलाराजे या सावंतवाडीच्या राजपरिवारात आल्या. सरलाराजे या बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पणती व महाराज प्रतापसिंह गायकवाड आणि राणीसाहेब शांतादेवीसाहेब यांच्या तृतीय कन्या. त्यांचा जन्म २ सप्टेंबर १९३५ ला गुजरातमध्ये झाला. सरलाराजे या केवळ सुंदरच नव्हत्या तर हसऱ्या, चपळ, नाजूक आणि सहजपणे नजरेत भरणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या धनी होत्या. लहानपणापासून त्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे सगळ्यांना परिचित होत्या. आपली मते मांडताना त्या कधी घाबरत नसत. त्यांची शाळा बडोद्याच्या राजवाड्याच्या विस्तीर्ण परिसरात होती. शाळेत सरलाराजे आणि त्यांची भावंडे सयाजीराव महाराजांनी आणलेल्या छोट्या ट्रेनमधून जात असत. या शाळेत सरदार राजघराण्यातील नातेवाईक आदींची मुले शिक्षण घ्यायची. सरलाराजेंचे शिक्षण मॅट्रीकपर्यंत झाले. हस्तकलेविषयी त्यांच्यामध्ये विशेष रुची होती. त्यांनी भरतनाट्यमचे शिक्षणही घेतले होते. नृत्य, चित्रकला याची त्यांना विशेष आवड होती. चित्रामध्ये रंग भरण्यात त्यांचा विशेष कल असायचा. राम-लक्ष्मणाच्या बोर्डावर काढलेल्या चित्रात सरलाराजे रंग भरायच्या. त्याचे विशेष कौतुक होत असे. पानाफुलांपासून विविध प्रकारची सजावट करण्याकडे त्यांचा ओढा असायचा. यू. पी. राव यांच्याकडे त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले होते.
सरलाराजे यांचा श्रीमंत शिवरामराजे यांच्याशी ८ मे १९५१ ला विवाह झाला. यावेळी संस्थाने खालसा झाली होती. लोकशाहीचे पर्व सुरू झाले होते. तरीही हा विवाह सोहळा सावंतवाडीकरांसाठी शाही होता. यानिमित्ताने दोन राजघराण्यांचा तिसऱ्यांदा ऋणानुबंध जुळत होता. हा विवाह पुण्यातील कोरेगाव पार्क येथे झाला. यावेळी ग्वाल्हेरपासून कर्नाटकपर्यंतचे सर्व संस्थानिक हजर होते. बडोद्यातील सर्व आप्तेष्टांबरोबरच सरलाराजे यांच्या बालमैत्रिण असलेल्या मीनल धारकर याही आवर्जून उपस्थित होत्या. राजकन्या सरलाराजे यांचे नाव सत्वशिलादेवीराजे असे ठेवण्यात आले. सोहळा पुण्यात झाला तरी सावंतवाडीकरांना याचे अप्रुप होते. कारण संस्थाने खालसा झाली तरी राजघराण्याविषयीचे प्रेम येथील लोकांच्या मनात कायम होते. यामुळे नवदाम्पत्याचे संस्थानात जल्लोषात आणि शाही स्वरुपाचे स्वागत झाले.
शाही दाम्पत्य ११ डिसेंबर १९५१ ला सावंतवाडीत दाखल झाले. यावेळी सावंतवाडीच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरेला साजेसे स्वागत करण्यात आले. हे दाम्पत्य सायंकाळी पाचला जमनाबाई पॅव्हेलियन येथे दाखल झाले. प्रथम त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ची सलामी देऊन थाटात वरात काढण्यात आली. नवदाम्पत्याच्या दर्शनासाठी ग्रामीण भागातून हजारो नागरिक आले होते. यावेळी लोकांनी आपापल्या ग्रामदैवतांची अबदागिरे व वाद्ये वरातीसाठी आणली होती. मंगल वाद्यांच्या निनादाने वातावरण मंतरले गेले होते. ही मिरवणूक जिमखान्यावरून निघून गवळी तिठा, पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराजांचा पुतळा, सावंतवाडी बाजारपेठ, गांधी चौक, मिलाग्रीस चर्च, विश्रामगृह या मार्गे राजवाड्यात दाखल झाली. सर्व रस्ता सजविण्यात आला होता. पूर्ण रस्त्यात दुतर्फा मोठी गर्दी होती. दाम्पत्याला पुष्पहार अर्पण करण्यात येत होते. आतषबाजीही करण्यात आली. रात्री साडेआठला ही वरात राजवाड्यात पोहोचली. पूर्ण राजवाडा गर्दीने फुलून गेला होता. नवदाम्पत्याचा स्वागत सोहळा १२ डिसेंबरला सायंकाळी झाला. यावेळी निवडक नागरिकांना राजवाड्यात निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी राजवाड्याच्या बगिच्यात कार्यक्रम झाला. श्रीमंत शिवरामराजे यांनी उपस्थितांची आत्मीयतेने विचारपूस केली. राणीसाहेब सत्वशिलादेवी यांचा परिचय करून दिला. या दिवशी राजवाड्यात आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी विश्‍वनाथ बुवा वझे यांचा गायनाचा कार्यक्रमही झाला. या सोहळ्याने पुन्हा एकदा बडोदा घराण्याशी नाते घट्ट झाले.
..................
चौकट
वैभवशाली बालपण
सरलाराजे अर्थात सावंतवाडीच्या राणीसाहेब सत्वशिलादेवी यांचे बालपण खूप श्रीमंतीत गेले. सयाजीराव महाराजांनी आणलेल्या विजेवर चालणाऱ्या छोट्या आगगाडीतून त्या शाळेत जायच्या. तिला छोटे डबे, रेल्वेस्थानके, सिग्नल हे सर्व होते. राजवाड्याचा एकूण ३ ते ४ हजार एकरांचा विस्तीर्ण परिसर होता. त्यात त्यांचा लक्ष्मी निवास पॅलेस हा राजमहल होता. तो शिल्पकलेचा उत्तम नमुना होता. ५१२ फूट लांब, २०० फूट रुंद आणि २०४ फूट उंचीचा मनोरा असलेला हा महाल वैभवाने ओथंबून वाहणारा होता. त्या ठिकाणीच राणीसाहेबांचे बालपण गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com