संक्षिप्त

संक्षिप्त

कांदीवलीतील शेतकऱ्यांना
अळंबी उत्पादनाबाबत मार्गदर्शन
दाभोळ ः विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी कांदीवली येथील शेतकऱ्यांना अळंबी उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ''कृषी रत्न'' या गटांतील मुलींनी गावातील शेतकऱ्यांना अळंबी उत्पादनाबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच अळंबी उत्पादनाचे महत्त्व व फायदे समजावले. यावेळी संगीता माने, मंदा माने, किशोर सागर निकम, श्रवण कदम, चंदू मोरे, बापू खेडेकर, मंगेश पालकर, प्रियांका जाधव, अनंत चव्हाण, भरत पेवेकर, कृष्णा माने, प्रमोद माने, शिवाजी माने हे शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, प्रभारी अधिकारी डॉ. संतोष वरवडेकर, कार्यक्रम अधिकारी डॉ आशिष शिगवण यांनी मार्गदर्शन केले.


शिर्दे परिसरात गव्याचे दर्शन
दाभोळ : दापोली तालुक्यातील शिर्दे परिसरात दिवसाढवळ्या रानगव्याचे दर्शन होत असल्याने येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर यांच्या शिर्दे येथील चंद्रप्रभा वनराई या फार्म हाऊस जवळून जाणाऱ्या जालगाव-सडवली, कोळबांद्रे रस्त्यावर हा रान गवा दिसला. शिर्दे परिसरातील जालगाव, टाळसुरे, आपटी, बोरघर, सडवली, सडवे, कोळबांद्रे आणि वळणे या महसुली गावाच्या हद्दीत गेले आठ दिवस सतत रान गव्याचे दर्शन होत आहे. महाकाय बांध्याचा आणि चपळगतीने पळणारा रानगव्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
-----

आडे-पाडलेतील वणव्यात आंबा, काजू बागा खाक

दाभोळ ः दापोली तालुक्यातील आडे-पाडले येथे लागलेल्या भीषण वणव्यात हातातोंडाशी आलेल्या आंबा, काजूच्या बागा खाक झाल्या असून यात सुमारे 1 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पाडले भागात शिर्के आळी, भार्गवराम मंदिर परिसरातील जवळपास सर्व बागा वणव्यात जाळून खाक झाल्या असून काजू-आंब्याचे हातातोंडाशी आलेला उत्पन्न या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी खेड येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी वणवा आटोक्यात आणला. मात्र हाच वणवा आता आंजर्ले गावातील ताडाचा कोंड, चिखलतळे या बाजूला सरकला असल्याने आंजर्ले गावातील अनेक शेतकऱ्यांनी हा वणवा आटोक्यात आणला.
------

दापोलीतील विकासकामांसाठी निधी मंजूर

दाभोळ : भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे व दापोलीचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांच्या प्रयत्नातून दापोली विधानसभा कार्यक्षेत्रात रस्त्याच्या व पुलाच्या कामांचा समावेश राज्याच्या जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. यात महाड– दापोली–उंबरघर रस्ता, जालगाव गावातील 4 किमी रस्ता डांबरीकरण, जालगाव – गावतळे रस्त्यावरील कोडजाई नदीवर मोठा पूल बांधणे, मळे- वणौशी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे, उटंबर-केळशी-मांदिवली-देव्हारे रस्ता कॉंक्रिटीकरण, याच मार्गावरील लहान पुलाची पुनर्बांधणी करणे, चिखलगाव-बोरीवली- गोमराई रस्ता डांबरीकरण ही कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दिली आहे.
------

दापोलीत परीक्षांच्या कालावधीमुळे पर्यटक घटले

दाभोळ ः दापोली तालुक्यात पर्यटकांची संख्या घटली असून दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्यावर हे चित्र बदलेल अशी शक्यता येथील हॉटेल व्यावसायिकांनी वर्तविली आहे. सध्या दापोलीत तालुक्यात पर्यटक कमी संख्येने येत आहेत. समुद्र किनाऱ्यावर पर्यटक फारसे दिसून येत नाहीत. दापोलीत सध्या सुरमई, कोळंबी, पापलेट, बांगडे, चिकन या शनिवार व रविवारी येणाऱ्या पर्यटकांची मागणी असते. त्यासोबत काही पर्यटक मोदक, पुरणपोळी यांची फर्माइश करतात. फणसाच्या भाजीची मागणीही काही पर्यटकांकडून केली जात आहे. दापोली तालुक्यातील मुरूड, कर्दे, लाडघर, पाळंदे, हर्णै या पर्यटनक्षेत्रांना पर्यटकांची अधिक पसंती असते. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कुटुंबांसह पर्यटनाला येणारे पर्यटक जरी कमी झाले असले तरी मित्रमंडळीसह येणारे पर्यटक कायम आहेत. परीक्षा झाल्यावर एप्रिल व मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यटकांची गर्दी कायम राहील, अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com