बाह्य मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील 329 शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाह्य मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील 329 शाळा
बाह्य मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील 329 शाळा

बाह्य मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील 329 शाळा

sakal_logo
By

बाह्य मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील ३२९ शाळा
शिक्षण विभाग ; १५ मार्चनंतर शाळांची पाहणी होणार
रत्नागिरी, ता. १२ ः समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा सिद्धी उपक्रमातून २०२०- २१ या वर्षात स्वयंमूल्यमापन झालेल्या शाळांचे आता बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ३२९ शाळांचा समावेश आहे. स्वयंमूल्यमापन केलेल्या शाळांपैकी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील शाळा निवडण्यात आली आहे. १५ मार्चनंतर संबंधित शाळांना भेटी देऊन त्यांचे शाळासिद्धी बाह्य मूल्यमापन करण्यात येणार असून ऑनलाईन माहिती अपलोड केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
विद्यार्थ्यांना शाळांचा दर्जा समजावा, यासाठी शाळासिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानुसार शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात येत होते. परंतु उपक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत शाळांचे बाह्य मूल्यमापन झाले नव्हते. यावर्षी राज्यातील ११ हजार ८५१ शाळांचे बाह्य मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यातून ३२९ शाळा निवडण्यात आल्या आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळासिद्धी उपक्रमातून शाळांचे स्वयंमूल्यमापन झाले. त्याच शाळांमधून प्राथमिक १० हजार आणि माध्यमिक स्तरावरील एक हजार ८५१ शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यात प्राथमिकच्या २७८, तर माध्यमिकच्या ५१ शाळा आहेत. या शाळांचे बाह्य मूल्यमापन करण्यासाठी शाळा व निर्धारक निश्चित करण्यात येणार आहेत. त्या निर्धारकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी प्रतिशाळा ४९० रुपये निधी निर्धारकांना दिला जाणार आहे.

मूल्यांकनाची ४६
शाळांच्या भौतिक विकासासाठी शाळासिध्दी हा केंद्र शासनाचा मूल्यांकनाचा कार्यक्रम असून याअंतर्गत शाळांना दरवर्षी स्वयंमूल्यमापन करायचे असते व त्याची नोंद न्यूपा (नवी दिल्ली) यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर केली जाते. त्यानंतर बाह्य मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आहे. शाळेचा भौतिक विकास होऊन विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढावी, यासाठी शाळासिद्धी मूल्यांकनाची ४६ मानके आहेत.