
नेरुरमध्ये काजूसह आंबा कलमांना आग
88661
नेरूर ः येथे लागलेल्या आगीत काजू कलमे जळाली.
नेरुरमध्ये काजूसह
आंबा कलमांना आग
कुडाळ ः बागायती शेती, जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढत असून काल (ता.११) दुपारी तालुक्यातील नेरूर गावातील काजू, आंबा, बांबू या शेकडो एकरातील बागायतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग माडयाचीवाडी आणि नेरूर भागातील वाघोसेवाडी सडा, सोलकरवाडी सडा या विस्तृत परिसरात लागली. या भागात मोठ्या प्रमाणात काजू, आंबा आणि बांबू पीक शेतकरी घेतात. काल दुपारी लागलेली ही भीषण आग आजही काही ठिकाणी सुरूच असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. ऐन हंगामामध्ये शेतीला आग लागल्याने या भागातील सोलकर, प्रभू या स्थानिक नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीत सध्या कोकणात आगी लागण्याचे प्रमाण वाढले असून या आगी लावल्या जातात की नैसर्गिक लागतात, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तरीही शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
----
88662
मडुरा ः येथे आगीत जळून नुकसान झालेली काजू बाग.
मडुरा येथे काजू कलमे जळाली
बांदा ः ऐन काजू हंगामात मडुरा-रेखवाडी येथील शेतकरी पांडुरंग सहदेव राऊळ यांच्या दोन एकरवर असलेल्या काजू बागेततील उत्पन्न देणारी सुमारे दोनशे काजू झाडे जळाली. या घटनेत सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवित हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काल (ता.११) मध्यरात्री रेखवाडी येथील राऊळ यांच्या काजूबागेत अचानक आग लागली. सद्यस्थितीत काजू हंगाम सुरू असून दर दिवसा हजारो रुपयांचे काजू बी गोळा केली जाते. उत्पन्न देणारी कलमे जळाल्याने आमचे खूप मोठे नुकसान झाले. दोन एकरवरील जागेत असलेली २०० कलमे जळाली. यात दोन लाखांच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला. आग अटोक्यात आणण्यासाठी दिनेश राऊळ, प्रवीण राऊळ, अमोल राऊळ यांनी प्रयत्न केले; परंतु सकाळपर्यंत आग असल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न तोकडे पडले. दरम्यान, आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.