
तळेरेत होलिकोत्सव उत्साहात
88666
तळेरे ः येथे शिमगोत्सवासाठी काढलेला गोमूचा नाच. (छायाचित्र ः एन. पावसकर)
तळेरेत होलिकोत्सव उत्साहात
तळेरे, ता. १२ ः येथील होलिकोत्सव विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तळेरे-चव्हाटा येथे देवाला साकडे घालून शिमगोत्सवाची सांगता झाली.
तळेरे चव्हाटा येथे गाव होळीच्या ठिकाणी वाद्यांच्या गजरात पालखीतून सर्व देवतांचे आगमन, त्यानंतर त्यांचे पूजन व इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात. दररोज रात्री विविध सांस्कृतिक, क्रिडा, धार्मिक कार्यक्रमांनी जागविण्यात आल्या. शिमगोत्सवात गोमूचा नाच लक्षणीय ठरला. गाव होळीसमोर पहिला नाच करुन मग विविध वाडितील घरासमोर हा नाच विविध पारंपारिक गाण्यांच्या तालावर केला जातो. यामध्ये गोमूला मान दिला जातो. यादरम्यान श्री. गांगेश्वर नाट्य मंडळ तळेरे यांच्याकडून गावातील लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नाईट क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. नवनियुक्त सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे आणि सर्व सदस्य, गांगेश्वर नाट्य मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांचे विशेष सत्कार करण्यात आले. कोकणातील गाव होळीकडे शिंपणे हा प्रकार शेवटच्या दिवशी पहायला मिळतो. या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. आणि याचदिवशी अनेक भक्त देवाला साकडे घालतात. वर्षभर आमचे रक्षण कर, असे देवाला साकडे घातले जाते. त्यानंतर इतर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा देव मंदिरात जातात. यादरम्यान गावातील सर्व ग्रामस्थ या चव्हाट्यावर एकत्र जमतात.