
चिपळूण -चिपळूण पालिकेची कर वसुलीसाठी जोरदार मोहीम
पान ३ साठी
करवसुलीसाठी जोरदार मोहीम
१४ पथकांची नियुक्ती; चिपळूणमधील ४७ मालमत्ता जप्त
चिपळूण, ता. १२ ः येथील पालिकेने घरपट्टी वसुलीसाठी दहा तर पाणीपट्टी वसुलीसाठी चार पथक नेमले आहेत. मालमत्ता कर हा नगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. शहरातील थकबाकीदारांवर जप्ती, लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात येत असून १५ मार्चपर्यंत पालिकेने विविध समाजमाध्यमांद्वारे थकबाकीदारांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर थकबाकीदारांकरिता अभय योजना लागू करण्यात आली होती. आता मोठ्या रकमेची थकबाकी असणाऱ्यांवर पालिकेने कर वसुलीसाठी लक्ष केंद्रित केले. थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी ठराविक दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. तरीही रक्कम न भरल्यास मालमत्ता अटकावणी करून जप्ती, लिलावापर्यंतची धडक कारवाई करण्यात येणार आहे.
घरपट्टी वसुलीसाठी दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाने शहरातील ४७ मालमत्ता जप्त केल्या. पालिकेच्या कारवाईनंतर १० जणांनी पूर्ण कर आणि दोघांनी अर्धे पैसे भरले. उर्वरित मुदत घेऊन जप्ती काढून घेतली. पालिकेला मालमत्ता कराच्या रुपाने १६ कोटी रुपये येणे आहे. आतापर्यंत ९ कोटी ६ लाख रुपये जमा झाले आहेत. ६ कोटी ९४ लाख रुपये येणे आहेत. तसेच पाणीपट्टी वसुलीसाठी चार वसुली पथक नेमण्या आली आहेत. यामध्ये एक अधिकारी व २ फिटर कर्मचारी यांचा समावेश आहे. ९७ थकबाकीदारांची नळ जोडणी तोडण्यात आली आहे. या कारवाईनंतर ४४ जणांनी पूर्ण पाणीपट्टी भरून नळ जोडणी पूर्ववत केली आहे. पाणीपट्टीची मागणी २ कोटी ५० लाख रुपये आहे. १ कोटी ६ लाख वसुल झाले असून १ कोटी ४४ लाख रुपये येणे बाकी आहे.
कोट
मालमत्ताकर भरणे हे प्रत्येक मालमत्ताकरधारकाचे कर्तव्य असून याद्वारे जमा होणाऱ्या महसुलातून नागरी सुविधांची पूर्तता करण्यात येते. त्यामुळे थकबाकीदारांनी कायदेशीर कारवाईची कटू वेळ येऊ न देता थकबाकी तसेच नियमित मालमत्ता कर त्वरित भरणा करावा.
- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका