ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू
ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू

ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू

sakal_logo
By

88705
आंबोली ः घाटातील याच ठिकाणी ट्रक कोसळला.

88707
आंबोली ः आंबोली रेस्क्यू टीम व सांगेली येथील बाबल आल्मेडा टीमने मृतदेह बाहेर काढला.

आंबोली घाटात
ट्रक कोसळून
बेळगावचा चालक ठार
आंबोली/सावंतवाडी, ता. १२ ः आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतूक करणारा ट्रक दीड हजार फूट दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला. शंकर मनोहर पाटील (वय २८, रा. नंदगड, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. पहाटे हा अपघात झाला. याबाबतची माहिती घाटात दरडीसाठी जाळी लावणाऱ्या कामगारांनी आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलिसांना दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, आंबोली घाटात सध्या धोकादायक दरडींच्या ठिकाणी जाळी बसविण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी कामगार घाटातून दररोज ये-जा करीत असतात. आज सकाळी कामगार कामावर येत असताना त्यांना मुख्य दरडीखाली आंबोलीपासून सावंतवाडीच्या दिशेने सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर घाटाच्या बाजूने कठडा तुटलेला दिसला. त्यामुळे त्यांनी पाहिले असता त्यांना एक ट्रक खाली कोसळलेला दिसला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती आंबोली पोलिस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांना दिली. देसाई यांनी सहकारी पोलिस कॉन्स्टेबल राजेश नाईक यांच्यासोबत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम व सांगेली येथील बाबल आल्मेडा टीमला पाचारण करण्यात आले. आंबोली बचाव पथकात दीपक मेस्त्री, दीपक नाटलेकर, ओंकार कळसुलकर, प्रथमेश गावडे, सागर ढोकरे, वामन पालेकर, तसेच सांगेली येथील बाबल आल्मेडा टीम यांनी मदतकार्यात सहभागी होऊन मृतदेह बाहेर काढला.
तो मृतदेह शंकर पाटील (वय २८, रा. नंदगड, जि. बेळगाव) यांचा असल्याचे समजले. शंकर हा बसू नाईक यांच्या मालकीच्या ट्रकवर कामाला होता. नेहमीप्रमाणे तो काल (ता.११) रात्री मालवण येथून चिरे भरून आंबोलीकडे येण्यास निघाला होता. आज पहाटेच्या सुमारास आंबोली घाटात आला असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक सरळ दरीत कोसळला. यात चिरे खाली कोसळून चिऱ्यांच्या खाली दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला. याबाबत सावंतवाडी पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.