
तिन्हीं बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा रंगला
rat१३२२.txt
फोटो ओळी
- rat१३p१५.jpg ः
८८७५१
आबलोली ः आबलोलीत रंगला पालखी सोहळा
--
तिन्हीं बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा रंगला
आबलोली, खोडदेतील ग्रामदेवता ः भाविकांची गर्दी
गुहागर, ता. १३ ः तालुक्यातील आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री नवलाईदेवी यांच्या पालखी भेटीचा तिन्हीं बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात पार पडला. फटाक्या़ंची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात रंगलेला पालखी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
नवलाईदेवीची गळाभेट होताना दोन्हीं पालखींच्या आतील नारळांची आपोआप अदलाबदल होते, अशी आख्यायिका सांगण्यात येते. आबलोली खालील पागडेवाडी येथील जे मानकरी नऊ दिवस देवीच्या नावाने श्रद्धापूर्वक कडक उपवास करतात ते रमेश गोणबरे, सुरेश गोणबरे, दिलीप गोणबरे, राजेश गोणबरे, प्रमोद गोणबरे हे नवलाईदेवीच्या पालखीसमोर सहाणेवर नतमस्तक होऊन धारदार शस्त्राने स्वतःच्या अंगावर मारतात; मात्र, या वेळी कसल्याही प्रकारची इजा होत नाही, साधे खरचटतही नाही किंवा रक्तही येत नाही. फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सूर्योदयाबरोबर आबलोली-खोडदे येथील होम पेटवण्यात आले. दुपारनंतर आबलोली येथील श्री नवलाई देवी, खोडदे गणेशवाडी येथील श्री नवलाईदेवी, खोडदे सहाणेचीवाडी येथील श्री नवलाईदेवी या तिन्हीं पालख्या तिन्हीं बहिणी आपल्या लाडक्या भावाला गोपाळजीला भेटून आल्यानंतर आबलोली येथील होळीच्या मैदानावर नाचवण्यात आली. याचवेळी दुपारनंतर सहाणेवर जत्राही भरली होती.
विशेष म्हणजे आबलोली येथील श्री नवलाईदेवीच्या पालखीला खोडदे येथील श्री नवलाईदेवीच्या पालख्या क्रमाक्रमाने भेटतात. या बहिणी गळाभेट घेताना या देवतांमध्ये बहिणींच नातं असल्याने ग्रामस्थ आवर्जून सांगतात. दोन्ही गावातील लोकांनी खांद्यावर पालखी वाहून नेणाऱ्या भाविकांना उचलून घेतले. त्यानंतर गावातील ग्रामस्थांच्या खांद्यावर उभ्या असलेल्या ग्रामस्थांच्या खांद्यावरील पालख्या वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत पालख्यांची गळाभेट झाली. आबलोली-खोडदे पालख्यांची, श्री नवलाईदेवीच्या बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजूला ग्रामस्थ नाचवत होते. पहिली पालखी भेटून निघून गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्रामदैवतेला भेटली. आबलोलीतील होळीच्या मैदानावर रंगणारा हा पालखीभेट, गळाभेट सोहळा संस्मरणीय ठरला.