कुणकेरी हुडोत्सवाची घोडेमोडणीने सांगता

कुणकेरी हुडोत्सवाची घोडेमोडणीने सांगता

swt१३१८.jpg
L८८७८७
कुणकेरीः हजारो भाविकांच्या उपस्थितीत हुडोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

कुणकेरी हुडोत्सवाची घोडेमोडणीने सांगता
वाघाचा खेळ लक्षवेधीः जिल्हाभरातील हजारो भाविकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः कुणकेरी येथे हुडोत्सव थाटात साजरा करण्यात आला. हुड्यावर चढणाऱ्या अवसारांवर दगडफेक करण्यात आली. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी आज जल्लोषात शिमगोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हाभरातून दाखल झालेल्या भाविकांमुळे उत्सवास जत्रोत्सवाचे स्वरूप आले होते.
कुणकेरी येथे श्री देवी भावई मंदिराच्या शेजारी हुडोत्सव साजरा होतो. शिमगोत्सवात घोडेमोडणी, रोंबाट, कवळे जाळणे, रंगपंचमी, धुळवड आणि हुडोत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो. यावेळी गावातील चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिमगोत्सव सणाच्या आनंदात सहभागी होत असतात. कुणकेरी येथे श्री देवी भावईच्या भेटीला आंबेगाव व कोलगाव येथील देवांच्या तरंगकाठीसह वाजतगाजत स्वारी येते. आगमन व स्वागतानंतर सुमारे १०० फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या हुड्यावर अवसारी स्वारी चढतात. यावेळी उपस्थित भाविक अवसारांच्या दिशेने दगडफेक करतात. हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविकांच्या नजरा हुड्याच्या उंच आकाशी भिडणाऱ्या टोकाकडे लागतात. यावेळी ढोलताशा आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. देव तरंग काठीसह रोंबाट येताना वाटेत झोपून ईडा-पीडा जाण्यासाठी भाविक नवस फेडतात. शनिवारी दुपारी गाव रोंबाट सुटल्यानंतर सायंकाळी हुड्याजवळ सामुहिक नारळ फोडण्यात आला. त्यानंतर घुमटवादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात आली. रात्री गाव रोंबाटाला सुरुवात झाल्यानंतर हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकण्यात आल्या. त्यानंतर ढोलताशांसह ''भाभीचे रोंबाट'' आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा चित्तथरारक कार्यक्रम झाला.
रविवारी सकाळपासून भावई देवीच्या निवासस्थानी ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांसाठी महिलांसह भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी तीनच्या सुमारास मांडावरून गाव रोंबाट सुटले. याचवेळी पळसदळा येथे आंबेगाव श्री देव क्षेत्रपाल निशाण भेट, त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर निशाण भेट होऊन सर्वजण सवाद्य मिरवणुकीसह भावई मंदिरकडे निघाले. यावेळी ढोलताशांसह फटाक्यांच्या आतषबाजीत बेभान होऊन नाचणारे रोंबाटकरी खास आकर्षण ठरले. हुडोत्सवातील घोडेमोडणी, वाघाची शिकार अशा अनेक धार्मिक प्रथा परंपरेच्या कलाकृतींनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
आंबेगाव आणि कोलगावसह कुणकेरी अशा तीन गावांचे रोंबाट हुड्याजवळ आल्यानंतर सायंकाळी ६ वाजता घोडेमोडणी व लुटीपुटीचा लक्षवेधी खेळ झाला. सायंकाळी ७ वाजता ११० फूट गगनचुंबी हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसारांचा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या नजरा वळल्या. भक्ती आणि शक्तीचा हा अनोखा सोहळा उपस्थित हजारो भाविकांनी अनुभवला. त्यानंतर हुड्यावर टोकावर पोहोचलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. या हुडोत्सवाच्या नियोजनासाठी स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com