रत्नागिरी ः प्राथमिक शिक्षकांची 1800 पदे रिक्त राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः प्राथमिक शिक्षकांची 1800 पदे रिक्त राहणार
रत्नागिरी ः प्राथमिक शिक्षकांची 1800 पदे रिक्त राहणार

रत्नागिरी ः प्राथमिक शिक्षकांची 1800 पदे रिक्त राहणार

sakal_logo
By

शिक्षकाचे चित्र वापरावे..

जिल्हा परिषद शाळांत शिक्षकांची वानवा
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ; अठराशे पदे रिक्त होणार, शिक्षणाचा प्रश्न गंभीर
रत्नागिरी, ता. १३ ः आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांना १ ते १५ एप्रिल या कालावधीत सोडण्यात यावे, असे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील रिक्त पदांचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. सध्या सुमारे ११०० पदे रिक्त असून आंतरजिल्हा बदलीने जाण्यास ७०० हून अधिक शिक्षक तयार आहेत. त्यांना सोडल्यास अठराशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त होतील. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची वानवा निर्माण होऊ शकते.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवरून चर्चा सुरू आहे. जिल्हा बदलून जाणार्‍या शिक्षकांची संख्या पाहता जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. राज्य शासनाने बदलीत पारदर्शकता यावी म्हणून २०१८-१९ मध्ये सॉफ्टवेअर विकसित केले; पण त्यामध्येही त्रुटी होत्या. ही प्रक्रिया सुरू असतानाच २०१९ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे २०२०-२१, २०२०-२२ या वर्षात बदली प्रक्रिया झाली नाही. २२-२३ मध्ये बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या बदल्या ऑगस्टमध्येच करण्यात आल्या. दहा टक्केपेक्षा जास्त पदं रिक्त असल्यामुळे त्यांना कार्यमुक्त केले नाही; परंतु शासनाने नुकताच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे बदलीने जाण्यास उत्सुक असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक टंचाई निर्माण होणार आहे. आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्ह्यात २०१७ पासून पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांना १६ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी असे शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७०० शिक्षक परजिल्ह्यात जाणार आहेत. येणार्‍या शिक्षकांची संख्या अवघी ८ आहे. या शिक्षकांची बदली केली तर रिक्त पदांची संख्या १ हजार ८०० वर जाणार आहे. यामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार असून याकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शासनाच्या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरवात झाली आहे. बदल्यांची फाईल येत्या दोन दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. सीईओ यावर कोणती कार्यवाही करतात यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला शिक्षकांसाठी आंदोलने करण्याची वेळ ग्रामस्थांवर येणार आहे.


कोट
आंतरजिल्हा बदलीने शिक्षक सोडायचे असतील तर पर्यायी शिक्षक शासनाने आधीच उपलब्ध करून द्यावेत. रिक्त पदे न भरताच शिक्षकांना सोडल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होईल. त्यामुळे शिक्षकांना सोडण्यास आमचा विरोधच आहे.
- परशुराम कदम, माजी सभापती, समाजकल्याण