
पावस-दाभिळ आंबेरेतील शाळा वर्षभर खासगी जागेत
फोटो ओळी
-rat१३p६.jpg- KOP२३L८८७४१
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील दाभिळ आंबेरे प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीची कवले दुरुस्तीच्या नावाखाली काढून ठेवण्यात आली आहेत
- rat१३p७.jpg ःKOP२३L८८७४२ पावस ः गेले वर्षभर एका खासगी जागेत शाळा सुरू आहे.
-------------
दाभिळ आंबेरेतील शाळा वर्षभर खासगी जागेत
दुरुस्तीची केवळ आश्वासने ; ग्रामस्थ संतप्त, १ मे पर्यंत दुरुस्ती न झाल्यास उपोषण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १३ ः रत्नागिरी तालुक्यातील दाभिळ आंबेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडकळीस आल्याने वर्षभर एका खासगी जागेत शाळा भरवली जात असून येत्या १ मे पर्यंत शाळेची दुरुस्ती न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पालकवर्गाने दिला आहे.
दाभिळ आंबेरे येथे गेली अनेक वर्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालवली जात असून पहिली ते चौथीपर्यंत सध्या २० ते २५ मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे गेल्यावर्षी धोकादायक इमारत असल्याने शाळा गावातील गुरव यांच्या घरी भरवली जात आहे. नादुरुस्त झालेल्या शाळेच्या इमारतीकडे गेल्या वर्षभर लक्ष न दिल्यामुळे इमारतीची दुरुस्ती अद्याप होऊ शकलेली नाही. सध्या या शाळेची दुरुस्तीकरिता कौले काढण्यात आली आहेत; मात्र दुरुस्तीच्या कामाला अद्याप कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या तहकूब ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला.
सरपंच गिजबिले यांनी पाच ते सहा दिवसात दुरुस्तीच्या कामाला सुरवात होईल, असे ग्रामसभेत सांगितले; परंतु अद्याप दुरुस्तीच्या कामाला सुरवात झालेली नाही. दुरुस्तीच्या कामाला निधी उपलब्ध झाला, असे सांगण्यात येते; मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही. अशा तऱ्हेने गेले वर्षभर सरपंच खोटी आश्वासने देत असल्यामुळे येत्या १ मेपर्यंत शाळेची दुरुस्ती करून मुले नेहमीच्या शाळेत न गेल्यास ग्रामस्थ उपोषण करणार आहेत. तातडीने शाळेची इमारत दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गांमधून होत आहे
कोट
या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेसंदर्भात दुरुस्तीचे कोणतेही टेंडर झालेले नसताना शाळेची कौले दीड ते दोन महिन्यांपासून काढून ठेवून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय व अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शाळा शेजारील एका घराच्या अंगणात भरवली जात आहे. याबाबत आम्ही मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे.
---अजय तेंडुलकर, पावस विभाग संघटक, शिवसेना