
-सिंधुदुर्गावर पावसाचे सावट
88850
वैभववाडी ः पावसाच्या वातावरणामुळे काढणी करून वाळत ठेवलेले कुळीथ पीक निवाऱ्याला ठेवण्याची सोमवारी सुरू असलेली लगबग.
जिल्ह्यावर पावसाचे सावट
---
वातावरणात बदल; पीक नुकसानीच्या भीतीने चिंता
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः जिल्ह्याच्या वातावरणात आज दुपारनंतर बदल होत ढगाळ वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) आणि शुक्रवारी (ता. १७) विजांच्या लखलखाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही भागांत हलका, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात पावसाचा प्रभाव अधिक, तर इतर भागांतही पावसाचा अंदाज आहे. यामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास कोणत्याही क्षणी पाऊस होईल, अशी स्थिती होती. वाऱ्याची गतीही वाढली होती. जिल्ह्यात सध्या आंबा, काजू या फळपिकांचा हंगाम सुरू आहे. वारा आणि अवकाळी पावसामुळे आंबा व काजू या दोन्ही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आंबा हंगाम सुरू होऊन अवघे काही दिवस झालेले आहेत. त्यातच हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले. आंबा बागायतदारांप्रमाणे काजू बागायतदारांचीही चिंता वाढली आहे. काजू बी गोळा करण्याचे कामही सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे काजू पिकाचे मोठे नुकसान झाले. पूर्वपट्टयात काजू पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच पावसाच्या शक्यता आणि वाऱ्याचा अंदाज दिल्याने काजू बागायतदारही हवालदिल झाले आहेत.
वातावरणात झपाट्याने बदल
जिल्ह्यातील वातावरणात आज दुपारनंतर झपाट्याने बदल जाणवू लागले. कोणत्याही क्षणी पाऊस होईल, अशी शक्यता निर्माण झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. रब्बी पिकांची काढणी केलेल्या शेतकऱ्यांनीही आवराआवर करण्यास सुरुवात केल्याचे चित्र होते.
कोट...
पावसाच्या शक्यतेने बागायदारांनी काढणीला आलेल्या आंब्याची येत्या दोन दिवसांत काढणी करून संभाव्य नुकसान टाळावे. अन्य हानी टाळण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे