
रत्नागिरी-क्राईम पट्टा
साळवी स्टॉपजवळ
अनोळखी मृतदेह
रत्नागिरी ः शहरानजीकच्या साळवी स्टॉप येथील पाण्याच्या टाकीखाली अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत रिक्षाचालक संजय गंगाधर खेत्री (वय ३४, रा. खडपेवठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार त्याला साळवीस्टॉप येथील पाण्याच्या टाकीखालील मोकळ्या जागेत मृतदेह दिसून आला. मृताचे अंदाजे वय ५२ असून उंची ५ फूट ७ इंच, गोल चेहरा, रंग निमगोरा, केस काळे-पांढरे, अंगात जांभळ्या रंगाचे फूल स्वेटर, नेसणीस जांभळ्या रंगाची फूल पँट आहे. शहर पोलिस ठाण्यात अथवा जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तळे गावातील देवीच्या मूर्तीची चोरी
खेड ः तालुक्यातील तळे येथील मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावातीलच एकास ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या मंदिरात देवीच्या दगडांची मूर्ती बसवण्यात आली होती. या दोन मुर्ती पुरातन काळातील होत्या. दोन मूर्ती येथील मंदिरातून दोन दिवसापूर्वी गायब झाल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासातच चोरट्यास ताब्यात घेतले. तपासासाठी श्वानपथकासही पाचारण करण्यात आल्याचे समजते.
--
पाचजणांना अटकपूर्व जामीन मंजूर
खेड ः शासकीय कामात अडथळा व खंडणी मागितल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या ५ जणांवर गुन्हा दाखल प्रकरणी ५ जणांना येथील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने संबंधित कार्यकर्त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. याबाबत येथील भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक सायली वसंत धोत्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चंद्रकांत तांबे, प्रदीप कांबळे, प्रणेश मोरे, यासीन परकार, शोएब खत्री (कोंडिवली) यांच्यासह अन्य ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कार्यालयात सहकारी शिवांनद टोम्पे यांच्यासह कर्तव्य पार पाडत असताना कार्यालयाच्या अभिलेख कक्षात अनधिकृतपणे प्रवेश करत चुकीच्या पद्धतीने कोंडिवली येथील जमिनीची मोजणी केली असे त्यांच्यासह सहकारी शिवानंद टोम्पे यांना शिवीगाळ व दमदाटी करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. हा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.