चिपळूण-दुसऱ्या टप्यातील गाळ काढण्याचे कामही नामला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-दुसऱ्या टप्यातील गाळ काढण्याचे कामही नामला
चिपळूण-दुसऱ्या टप्यातील गाळ काढण्याचे कामही नामला

चिपळूण-दुसऱ्या टप्यातील गाळ काढण्याचे कामही नामला

sakal_logo
By

गाळ काढण्याचा दुसरा टप्पाही ‘नाम’ला मिळणार
वाशिष्ठीतील उपसा; निधीची तरतूद झाल्यानंतर दुसऱ्या टप्पा देण्याच्या हालचाली
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः वाशिष्ठी नदीत दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम निधीअभावी ठप्प आहे; मात्र निधीची तरतूद झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मंजुरी मिळाल्यास गाळ काढण्याच्या कामातून जलसंपदा हद्दपार होणार असून गाळ काढण्याची सर्वस्वी जबाबदारी नाम फाउंडेशनवर येणार आहे.
वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून १० कोटीचा निधी मंजूर झाला होता. गाळ काढण्यासाठी बहादूरशेख नाका ते गोवळकोट पहिला टप्पा, बहादूरशेख नाका ते पोफळी दुसरा टप्पा आणि गोवळकोट ते करबवणे तिसरा टप्पा असे तीन टप्पे करण्यात आले आहे. गेल्या वर्षी जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशनमार्फत पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्यात आला. १० कोटींपैकी ८ कोटी ६३ लाख रुपये गेल्या वर्षी खर्च करण्यात आले. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा गाळ काढण्याचे काम सुरू झाले होते; मात्र जलसंपदा विभागाकडून संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोप करत जलसंपदा विभागाचे काम काढून घेण्यात आले आणि पहिल्या टप्प्यातील काम नाम फाउंडेशनला देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुंबईत झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाला दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम देण्यात आले होते; मात्र उपलब्ध निधीपैकी केवळ १ कोटी ३७ लाख रुपये शिल्लक आहेत. या निधीत दोन्ही टप्प्यातील गाळ निघणे शक्य नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम थांबवण्यात आले. पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणी युद्धपातळीवर गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी उर्वरित गाळ काढण्यासाठी आणखी ५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले; मात्र निधीची पूर्तता झालेली नाही त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम ठप्प आहे.
आमदार शेखर निकम यांनी गाळ काढण्यासाठी पालकमंत्र्यांकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. ५ कोटीचा निधी मिळाल्यानंतर गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनला देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून इंधन खर्च पुरवण्यात आला आहे. त्यासाठी लागणारी यंत्रणा नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभागाने उपलब्ध केली होती. नाम फाउंडेशनपेक्षा जलसंपदा विभागाचा गाळ काढण्याचा खर्च कमी आहे. असे असताना नाम फाउंडेशनला पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कोट
आम्ही उपलब्ध निधीचा वापर करून पहिल्या टप्प्यातील जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम निधीअभावी ठप्प आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर हे काम कुणी करावे, हे अद्याप ठरलेले नाही. भविष्यात त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
- शाहनवाज शाह, तांत्रिक सल्लागार नाम फाउंडेशन, चिपळूण