पावसाळ्यानंतरच काँक्रिटीकरण

पावसाळ्यानंतरच काँक्रिटीकरण

88998
करुळ ः तळेरे-गगनबावडा मार्गावरील येथील घाटरस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.

पावसाळ्यानंतरच काँक्रिटीकरण

तळेरे-गगनबावडा रस्ता; प्रशासकीय प्रकियेला विलंब; २४८ कोटी निधी मंजूर

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १४ ः काँक्रिटीकरणासाठी २४८ कोटी मंजूर झालेल्या तळेरे-गगनबावडा महामार्गाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे यावर्षी हे काम पूर्ण होऊन सुरळीत वाहतुकीची स्वप्ने पाहणाऱ्या वाहनचालकांची घोर निराशा होणार आहे. निविदा प्रकिया आणि इतर प्रशासकीय प्रकियेला विलंब झाल्यामुळे काम रखडले आहे.
तळेरे-कोल्हापूर मार्गावरील तळेरे-गगनबावडा हा रस्ता सतत नादुरुस्तीमुळे गेल्या चार-पाच वर्षांत चर्चेत राहिला. या मार्गावरील खड्डेमय करुळ घाट रस्त्यामुळे यावर्षी ऊस वाहतूक देखील भुईबावडा घाटमार्गे करावी लागली. गेल्या दोन वर्षांत ऊस उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान या महामार्गामुळे झाले. आता देखील या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. ३ जानेवारीला तळेरे-गगनबावडा महामार्गावरील २१ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी २४८ कोटीचा निधी मंजूर झाला. तत्पूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने निविदा प्रकिया सुरू केली होती. सुरुवातीला २७ जानेवारीला निविदा प्रकिया होणार होती. त्यानंतर ७ फेब्रुवारीला ही प्रकिया पूर्ण होऊन मार्चपासून रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मार्चमध्ये काम सुरू झाल्यास जूनपूर्वी करुळ घाटरस्त्याचे १० किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन यावर्षी पावसाळ्यापूर्वी सुरक्षित वाहतूक होईल, अशी अपेक्षा होती; परंतु निविदा प्रकिया आणि इतर प्रशासकीय प्रकिया अजूनही पूर्ण न झाल्यामुळे आता हे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यंदाही वाहनचालकांचा या मार्गावरील प्रवास खडतर बनण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने करुळ घाटरस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे; परंतु ही मलमपट्टी पावसाळ्यात टिकेल का?, याबाबत वाहनचालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
................
कोट
तळेरे-गगनबावडा मार्गावरील २१ किलोमीटरच्या क्राँकिटीकरणासाठी २४८ कोटी रुपये मंजुर असून निविदा प्रकिया सुरू आहे; परंतु हे काम आता पावसाळ्यानंतरच सुरू होईल. त्यामुळे सध्या करुळ घाटमार्गातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर हॉटमिक्सचे काम करण्यात येणार आहे. जेणेकरून पावसाळ्यात वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नाही.
- अतुल शिवनिवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
...............
कोट
नादुरुस्त करुळ घाटरस्त्यामुळे गेली दोन वर्षे ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. ऊस उत्पादक रडकुंडीला आला होता. ऊस उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले; परंतु रस्त्याच्या स्थितीत काहीही बदल झाला नव्हता. आता रस्ता मंजूर झाला आहे. त्यामुळे हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.
- समाधान जठार, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
...............
पाँईटर
रखडलेल्या कामावर एक नजर
* ‘तळेरे-गगनबावडा’ काँक्रिटीकरणास २४८ कोटी मंजूर
* तळेरे-कोल्हापूर हा ८४ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग
* दहा किलोमीटरचा करुळ घाटरस्ता वाहतुकीस धोकादायक
* नादुरुस्त घाटरस्त्यामुळे वाहतुकीत ४० टक्के घट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com