
रत्नागिरी ः रत्नदुर्ग किल्ला परिसरात शिवकालीन धान्यकोठार
rat१४p४४.jpg, rat१४p४५.jpg ः KOP२३L८९०२८ , KOP२३L८९०२९
रत्नागिरी ः किल्ला येथील शिवकालीन धान्यकोठाराच्या भिंती.
रत्नदुर्ग किल्ला परिसरात शिवकालीन धान्यकोठार
महेश कदम; इतिहासाच्या खुणांचे जतन करणे गरजेचे
रत्नागिरी, ता. १४ ः शिवकालीन इतिहासाची साक्ष असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्याजवळ हनुमानवाडी येथे धान्य कोठाराची इमारत आहे. त्याचे बांधकाम अत्यंत मजबूतरित्या असले तरीही काळाच्या ओघात ते धान्यकोठार भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. इतिहासाच्या खुणांचे जतन केल्या तर त्याचा पर्यटनाला फायदा होईल, असे इतिहास अभ्यासक महेश कदम यांनी सांगितले.
रत्नागिरी बंदराचा रक्षक असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यातील शिवकालीन धान्यकोठार भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ला परिसरातील हनुमानवाडी (मालुसरे वठार) येथे धान्य कोठाराची इमारत असून त्याचे बांधकाम अत्यंत मजबूतरित्या केले आहे. त्याला गोदाम म्हटले जात असून सुमारे १२० फूट लांब आणि २० फूट रूंद असणार्या, आयताकृती धान्य कोठाराची उभारणी चिरेबंदी पद्धतीने केलेली आहे. कोठाराच्या भिंतीची जाडी तीन फूट आहे. भक्कम आणि वरील बाजूस नक्षीदार काम केलेला दरवाजा आहे. दोन्ही बाजूला चार खिडक्यांची रचना दिसते. अंतर्गत भागात धान्य साठवणुकीच्या जागेसह इतर महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी लहान खोल्या दिसतात. हे शिवकालीन धान्यकोठार कोसळत असून, याच्या केवळ भिंतीच कशाबशा तग धरून उभ्या आहेत. या धान्यकोठाराचा वापर अगदी ब्रिटिश राजवट संपेपर्यंत केला जात होता. येथील आजूबाजूच्या परिसरात अनेक ऐतिहासिक चौथर्याचे अवशेष आहेत. या बांधकाम रचनेवरून किल्ल्याचा महत्वाचा भाग अस्तित्वात होता याचे अनुमान येते. या भागाचे रक्षण करण्यासाठी मिरे बंदराकडे समुद्रालगत बुरूजयुक्त भक्कम पाणकोट बांधला होता; पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला असून, त्याचे केवळ दोन बुरूज शिल्लक आहेत. रत्नागिरी बंदराच्या इतिहासाचा महत्वपूर्ण साक्षीदार असणार्या या कोठाराचे योग्यरित्या जतन होणे गरजेचे आहे.
चौकट
ऐतिहासिक पार्श्वभूमी
बहामनी, शिवकाल आणि पेशवेकाल अशा तीन कालखंडात रत्नदुर्ग किल्ल्याचा विस्तार होऊन नवीन इमारतींची उभारणी करण्यात आली. यात पेठकिल्ल्याची माची, मिरकरवाडा येथील पाणकोट याचा समावेश आहे. रत्नागिरी हे व्यापारी बंदर असल्यामुळे, परदेशातील अनेक व्यापारी जहाजे येथील मिरे बंदर धक्क्यास लागते. छत्रपती शिवरायांच्या जहाजबांधणीचे कामही येथे होत असे. कारण, मराठा आरमारातील एका जहाजाचे नाव ’गुराब-मिर्या दौलत’ असल्याचा उल्लेख सापडतो. देश-विदेशातून जहाजाद्वारे ने-आण होणार्या मालाची साठवणूक करण्यासाठी अथवा बंदरात कररूपाने मिळालेले धान्य एकत्रित करण्याकरिता येथे धान्यकोठार बांधण्यात आले. भात, नाचणी, वरी, नागली यांसह मसाल्याचे पदार्थही साठवले जात असावेत. त्या अनुषंगाने या परिसरात उत्खनन केल्यास अधिक माहिती मिळू शकेल, असे अभ्यासक कदम यांनी सांगितले.