गुहागर ः शेतीतही धनिक गुंतवणूकदार सरसावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः शेतीतही धनिक गुंतवणूकदार सरसावले
गुहागर ः शेतीतही धनिक गुंतवणूकदार सरसावले

गुहागर ः शेतीतही धनिक गुंतवणूकदार सरसावले

sakal_logo
By

संग्रहित -KOP20J64050

नवे शेतकरी नवा ट्रेंड भाग १ ......लोगो

इंट्रो

पर्यटन उद्योगामुळे गुहागर तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने होऊ लागले. सुरवातीचे जागांचे व्यवहार गुंतवणुकीसाठी, कोकणात हक्काचे घर हवे म्हणून झाले. त्याचबरोबर शेती बागायतीसाठी जमीन खरेदी करण्याचा कल वाढू लागला. त्यातूनच सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञान गुहागरमध्ये दाखल झाले. आज तालुक्याबाहेरील लोकांनी गुहागरमध्ये ५० हेक्टर क्षेत्र नव्याने लागवडीखाली आणले आहे. स्वाभाविकपणे यातून रोजगार निर्मितीही झाली आहे. कृषी विकासाचा हा नवा ट्रेंड गुहागरमधील वृक्षसंपदा वाढवण्यासाठी उपयोगी आहे; मात्र त्यासोबतच जैवविविधतेचा ऱ्हास होणार नाही याची काळजीही कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांना वाटू लागली आहे.

- मयूरेश पाटणकर, गुहागर

शेतीतही धनिक गुंतवणूकदार सरसावले
गुहागर तालुक्यातील चित्र; बाहेरील लोकांनी फुलवल्या फळबागा

गुहागर, ता. १४ ः गुहागर तालुक्यात पर्यटन उद्योगाच्या वाढीबरोबर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही वाढले. सुरवातीला सेकंड होमसाठी, गुंतवणूक म्हणून समुद्रकिनारा दिसेल अशा जागांची खरेदी मुंबईकर, पुणेकर करत होते. त्यातूनच पुढे बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून त्यात अकृषिक (एनए) प्लॉट विकसित केले. काहींनी टाऊनशिप बांधल्या. या प्रवाहाबरोबरच पुन्हा गावाकडे येऊन किंवा पडिक जमीन विकत घेऊन तेथे फळबागांची लागवड करण्याचा नवा ट्रेंडही सुरू झाला आहे. आज तालुक्यात सुमारे ५० हेक्टर जमिनीवर तालुक्याबाहेरील लोकांनी फळबागा विकसित केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून तीन वर्ष टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची योजना राबवण्यात आली. ही योजना स्थानिकांसाठी लाभदायक ठरली. अनेक ग्रामस्थांनी स्वमालकीच्या पडिक जमिनीवर आंबा, काजू लागवड सुरू केली. गुहागर तालुक्यात आज १५१३ हेक्टर पडिक जमीन लागवडीखाली आली आहे. यामध्ये मुख्यत्वे आंबा, काजू, नारळ, सुपारी यांची लागवड झाली आहे. याशिवाय गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी पुन्हा गावाकडे येऊन किंवा जागा खरेदी करून त्यावर फळबाग लागवड करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. तालुक्यातील गिमवी, मुंढर, झोंबडी, मढाळ, पाली, कौंढर काळसूर, मढाळ, पाटपन्हाळे, तळवली, चिखली, सुरळ या पट्ट्यात लागवडीचे प्रमाण अधिक आहे.
गेल्या १० वर्षात पर्यटन व्यवसाय वाढला. गुहागर-विजापूर महामार्ग झाला. मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे येथील जमिनींचा भाव वाढला. तेव्हा स्थानिकांनी जमिनीची विक्री करून पैसा मिळवला. याच जमिनी खरेदी करून त्या पुन्हा लागवडीखाली आणण्याचे काम नवे जागामालक करत आहेत. त्याचबरोबर नोकरी उद्योगासाठी गाव सोडून शहरात गेलेल्यांनी पुन्हा आपल्या जमिनीत लागवड केली. आज गुहागर तालुक्यात अशी सुमारे ५० हेक्टर जमीन लागवडीखाली आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी नारळ, सुपारी, आंबा, काजूबरोबरच हळद, कलिंगड, स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, कंदपिकांची लागवड सुरू केली आहे.

कोट
तालुक्यात गेल्या चार-पाच वर्षात मुंबईतून परत गावात येऊन किंवा गावाकडची जमिन विकत घेऊन त्यामध्ये फळबाग लागवड करण्याचा ट्रेंड वाढतोय. नारळ, आंबा आणि काजू लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे नवे जागामालक आमच्या कंपनीचे भागीदार होण्यासही उत्सुक आहेत. आम्ही १५ ते २० जणांना शेअर्स दिले आहेत. ही संख्या पुढील काळात दुप्पट होणार आहे.
- मंदार जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनी