चिपळूण ः प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या घोषणा
चिपळूण ः प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या घोषणा

चिपळूण ः प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या घोषणा

sakal_logo
By

फोटो
- ratchl१४१.jpg ःKOP२३L८८९८६
चिपळूण ः जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारविरोधी निदर्शने करताना चिपळूण तालुक्यातील सरकारी कर्मचारी.

प्रांत कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या घोषणा
चिपळूणात संप यशस्वी ः अंत न पाहता वेळीच निर्णय घ्या
चिपळूण, ता. १४ ः आमदार, खासदारांना वेतनवाढ आणि पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो. त्याला कोणीही विरोध करत नाही. शासकीय तिजोरीवर आर्थिक भार पडत नाही; मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन हात आखडता घेते. आता मात्र जुनी पेन्शन लागू झाल्याशिवाय माघार नाही, असे सांगून ''ये अंदर कि बात है जनता हमारे साथ है'' चा नारा देत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली.
''एकच मागणी पूर्ण करा, जुनी पेन्शन लागू करा'' या मागणीसाठी मंगळवारी (ता. १४) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुरवात केली. चिपळूण तालुक्यातील राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले होते. सकाळी दहाच्या सुमारास प्रांत कार्यालयासमोर सर्व संपकरी कर्मचारी दाखल होण्यास सुरवात झाली. शहरासह तालुक्यातील शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग, तालुका कृषी, पंचायत समितीमधील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी, महसूल आदी विविध विभागातील राज्य सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. समन्वय समितीचे प्रकाश सावंत यांनी संपाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर शिक्षण, महसूल, ग्रामसेवक, आरोग्य, कृषी आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रामुख्याने संपकऱ्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. गेल्या १५ वर्षापासून जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी लढा देत आहेत; मात्र प्रत्येकवेळी शासनाकडून विविध कारणे सांगितली जातात. सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडणार असल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल केली जाते; मात्र आमदार, खासदारांना वेतनवाढ असो अथवा पेन्शन लागू करताना क्षणात निर्णय घेतले जातात. लोकप्रतिनिधी जसे जनतेचे सेवक आहेत तसेच आम्हीही जनतेचेच सेवक आहोत. त्यामुळे वृद्धापकाळ जगण्यासाठी पेन्शन लागू करण्यात यावी. शासनाच्या नवीन पेन्शननुसार अलिकडेच जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांतील काहींना प्रति महिना ७०० रुपये पेन्शन मिळत आहे. साधा घरगुती गॅसचा सिलेंडर घ्यावयाचा झाल्यास १२०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी जुनी पेन्शन लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


काम बंद आंदोलनाला राजापुरात प्रतिसाद
राजापूर ः जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसाठी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला राजापूर तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व कर्मचाऱ्यांनी राजापूर तहसील कार्यालय परिसरात एकत्र येत घोषणा दिल्या.नेहमी वर्दळ असलेली तालुक्यातील शासकीय कार्यालये ओस पडली. पेन्शन आमच्या हक्काची .... नाही कुणाच्या बापाची ...इथपासून नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा कर्मचारी देत होते. कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरू झालेल्या बेमुदत संपामुळे सर्व सामान्य नागरिकांची पंचाईत झाली होती. कार्यालये ओस पडल्याने शासकीय कामासाठी आलेल्यांना माघारी परतावे लागले.