
देवगडचा हापूसला 1500 रुपये डझन
rat१४२८.txt
बातमी क्र. २८ (पान २ मेन साठी)
देवगड हापूस दीड हजार रूपये डझन
चिपळुणातील सर्वसामान्यांना प्रतीक्षाच ः बागायतदारांचा कल मुंबई, पुणेकडे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः यंदा हवामानातील बदलांमुळे आंबा उत्पादन कमी आहे. त्यामुळे बाजारातील आंब्याचे दर चढेच आहेत. प्रसिद्ध देवगड हापूस चिपळूणच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे; मात्र हा आंबा डझनाला १५०० रूपयांनी विकला जात आहे. उन्हाळ्यामध्ये आंब्याचे सर्वांनाच आकर्षण असते. तरिही दर चढे असल्यामुळे सर्वसामान्यांना चव चाखण्यास प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
येथील बाजारपेठेत साधारण फेब्रुवारी महिन्यापासून रत्नागिरी हापूस विक्रीसाठी दाखल होतो तसेच देवगड हापूस विक्रीसाठी एप्रिल महिन्यात दाखल होतो; मात्र यंदा उन्हाळ्यात आंब्याची गोडी लवकर चाखता यावी यासाठी मार्च महिन्यातच देवगड आंबा बाजारात दाखल झाला आहे. काही व्यापारी रस्त्याच्या कडेला बसून देवगड हापूसची विक्री करत आहेत. एका पेटीत साधारण दोन डझन आंबे असतात. २५०० हजार ते ३ हजार रुपये पेटी दराने आंब्याची विक्री सुरू आहे. यावर्षी रत्नागिरी हापूस कमी आहे. चांगला दर मिळेल या हेतूने येथील बागातदारांनी स्थानिक बाजारपेठेत आंबा विकण्याऐवजी मुंबई, पुणे आणि इतर शहरात रत्नागिरी हापूस विकण्यास पसंती दिली आहे. रत्नागिरी हापूस स्थानिक बाजारपेठेत कमी प्रमाणात दाखल झाल्यामुळे देवगड हापूस आंबा भाव खात आहे. येथील मध्यमवर्गीय व श्रीमंत लोक देवगड आंब्याला पसंती देत आहेत. देवगड आणि रत्नागिरी हापूस बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला असला तरी अद्याप त्याला मागणी कमी आहे. गुढीपाडवा झाल्यानंतर हापूसच्या मागणीत वाढ होईल, असे आंबाविक्रेते सांगत आहेत.
कोट
यंदा मोसम उशिरा सुरू झाल्याने बाजारपेठेत हापूसही उशिरा दाखल झाला आहे. सध्या आवक कमी आहे. गुढीपाडव्यानंतर मागणी आणि आवक वाढल्यानंतर हापूसचे दर कमी होतील. नागरिकांनी आंबा विकत घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे. सध्या बाजारात प्रक्रिया केलेली फळं आणली जातात.
- गणेश धुरी, खेर्डी आंबाविक्रेते