‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एकच मिशन, जुनी पेन्शन’
‘एकच मिशन, जुनी पेन्शन’

‘एकच मिशन, जुनी पेन्शन’

sakal_logo
By

89089
सिंधुदुर्गनगरी ः जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.


‘एकच मिशन, जुनी पेन्शन’

सिंधुदुर्गनगरीत कर्मचाऱ्यांच्या घोषणा; संघटनेच्या मोर्चात ३ हजारावर सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘आमच्या मागण्या मान्य करा’, आदी गगनभेदी घोषणा देत मनाई आदेश मोडीत काढत जिल्ह्यातील ६२ सरकारी कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आज ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा भव्य मोर्चा काढला. यात सुमारे ३ हजार कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यावर या मोर्चाचे धरणे आंदोलनात रूपांतर झाले.
जुनी पेन्शन योजना लागू करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे तातडीने भरा, आठवा वेतन आयोग स्थापन करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करु नका, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करा या प्रमुख मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकत्र येत जिल्ह्यात लागू असलेला मनाई आदेश मोडीत काढत जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी, शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. दुपारी साडे अकरानंतर सुरू झालेला मोर्चा विविध घोषणा देत सव्वा बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात विविध कर्मचारी संघटनांचे सुमारे ३ हजार एवढे कर्मचारी सहभागी झाले होते.
जिल्हा परिषदेच्या एकूण ५१६८ कर्मचाऱ्यापैकी ४६८७ कर्मचारी संपावर असून २५४ कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत. आजच्या दिवशी केवळ २२७ कर्मचारी जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. जिल्हा महसूल प्रशासनातील एकूण ५२४ कर्मचाऱ्यांपैकी १९ कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत तर आजच्या दिवशी ३० कर्मचारी कार्यालयात उपस्थित असून ४७५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा महसूल प्रशासनाने दिली. दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीला पोलिस छावणीचे स्वरुप आले.
----------
चौकट
प्रत्येक संघटनांचे आजपासून ‘धरणे’
आजच्या या संपात जिल्ह्यातील विविध ६२ संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यांचे एकूण १७ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघटनेच्या माध्यमातून उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत संप आणि धरणे आंदोलन सुरू ठेवले जाईल, असे समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी सांगितले.