
पान एक-सरकारी कर्मचारी संपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद
पान एक
सरकारी कर्मचारी संपाचे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद
कामकाज ठप्प; दमदार मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी आजपासून राज्यभर सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यात संपाचा पहिला दिवस यशस्वी झाला असून बहुसंख्य कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार ठप्प झाला असून जिल्ह्यातील कार्यालयांत फक्त अधिकारी वर्ग दिसून आला.
जुन्या पेन्शनसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. आजपासून हे कर्मचारी संपावर गेले असून पहिल्याच दिवशी सिंधुदुर्गात मोर्चा काढत प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. संपात जिल्हा परिषद, नगरपालिका यांसह राज्याच्या विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले. प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकही संपात उतरल्याने याचे मोठे पडसाद दिसू लागले आहेत. सध्या दहावी आणि बारावी परीक्षा सुरू असल्याने शिक्षकांचा संप सुरूच राहिल्यास परीक्षेचे पर्यवेक्षण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यातील विविध ५६ विभागांचे १७ हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे समन्वय समिती जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांनी सांगितले होते. आज पहिल्या दिवशी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट होता. तर शिक्षकांनी शाळेत हजेरी लावत मोर्चाला उपस्थिती दर्शविली. सायंकाळी उशिरापर्यंत संपाबाबत निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे संप सुरूच राहिल्यास प्रशासकीय कारभार ठप्प होणार आहे. वर्ष अखेर जवळ आली असून याचा विपरित परिणाम निधी खर्चावरसुद्धा होण्याची शक्यता आहे.