
...अन्यथा स्वच्छतागृहाचे उद्घाटन करू
89113
बांदा ः वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांच्याशी चर्चा करताना रियाज खान व शिवसेना पदाधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
...अन्यथा स्वच्छतागृहाचे उद्घाटन करू
शिवसेनेचा इशारा; बांदा बसस्थानकप्रश्नी अधिकारी धारेवर
बांदा, ता. १४ ः येथील बसस्थानक आवारात बांधलेले स्वच्छतागृह अद्याप खुले न केल्याने शिवसेनेचे अल्पसंख्याक सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकात धडक देत वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना जाब विचारला. यावेळी आठ दिवसांत स्वच्छतागृह खुले न केल्यास शिवसेनेतर्फे उद्घाटन करून जनतेच्या सेवेसाठी खुले करण्याचा इशारा खान यांनी यावेळी दिला.
येथील बसस्थानक आवारात जनतेच्या सेवेसाठी ‘पे टॉयलेट’ उभारले आहे. याचे बांधकाम होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप जनतेच्या सेवेसाठी खुले केलेले नाही. यासंदर्भात महिन्याभरापूर्वी शिवसेनेने विचारणा केली होती. त्यावेळी आठ दिवसांत स्वच्छतागृह खुले करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र कार्यवाही पर्यंत खुले न केल्याने शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले. बांदा बसस्थानकावर प्रवासी, विद्यार्थी यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते, अशा तक्रारी आल्याने आज सकाळी खान यांच्या नेतृत्वाखाली राजा खान, मोहसीम खान, सागर धोत्रे, अक्षर खान, व्यंकटेश उरूमकर, रिझवान खान, सूर्या राठोड, प्रताप राठोड, लखन जाधव यांनी धडक देत वाहतूक निरीक्षक प्रकाश नार्वेकर यांना जाब विचारला. यावेळी नार्वेकर यांनी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. खान यांनी कणकवली विभागीय कार्यालयातील विभागीय अभियंता अक्षय केंकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत कडक शब्दांत जाब विचारला. त्यावेळी त्यांनी निविदा प्रक्रिया राबवून याचा मक्ता निश्चित करण्यात येईल व त्यानंतरच टॉयलेट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. या सर्व प्रक्रियेला आठ दिवसांचा कालावधी लागणार असून २७ मार्चपर्यंत टॉयलेट सुरू करण्याचे आश्वासन दिले. आठ दिवसांत स्वच्छतागृह सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून स्वच्छतागृह जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असा इशारा खान यांनी यावेळी दिला.