
साडवली ः देवरूख ओझरे समर्थ मठात 15 मार्चला समग्र दर्शन प्रदर्शन
देवरूख ओझरे समर्थ मठात
आज समग्र दर्शन प्रदर्शन
साडवली, ता. १४ ः देवरूखजवळील ओझरे येथील श्री स्वामी समर्थ मठाचा २३ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. बुधवारी (ता. १५) व गुरुवारी (ता. १६) श्री स्वामी समर्थ समग्र दर्शन प्रदर्शन भरवले जाणार आहे, अशी माहिती मठाचे प्रमुख अजित तेलंग, संजय वेंगुर्लेकर, मदन मोडक यांनी दिली.
या प्रदर्शनात स्वामी समर्थांच्या अस्सल प्रतिमा, चरणपादुकांचे दर्शन, त्यांच्या शिष्योत्तमांचे, श्री स्वामीस्पर्शित दुर्मिळ अनेक वस्तूंचे तसेच अक्कलकोटमधील श्री स्वामीलिला स्थळांचे भावस्पर्शी १२५ फोटो ठेवण्यात येणार आहेत. श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील अनेक घटनांचा, स्थळांचा स्वामीभक्त संजय वेंगुर्लेकर यांनी अनेक वर्ष अभ्यास करून, भटकंती करून खरा इतिहास शोधला आहे. राजापूर गंगाक्षेत्री स्वामींनी स्वतः येऊन पादुका दिल्याचेही सिद्ध झाले आहे. संगमेश्वर शेवरवाडी येथे सेवेकरी लक्ष्मणराव मुळ्ये यांना स्वामींनी पादुका दिल्या होत्या. मुळ्ये यांचे नातू गणेश यांच्या हातचे जेवण स्वामी सेवन करत होते. जैतापूर खाडीजवळ माजरेकर यांच्या घराजवळ एक शिळा आहे. तेथे स्वामी समर्थ बसले होते, याची नोंद आहे. अशा अनेक नवीन बाबी व त्यांचे फोटो या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. स्वामी भक्तांनी ओझरे मठ येथे सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन अवश्य पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.