
लांजा ः तालुक्यातील 1500 कर्मचारी आंदोलनात
लांजा तालुक्यातील १५०० कर्मचारी आंदोलनात
लांजाः कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय, अशा घोषणांनी मंगळवारी लांजा तहसील परिसर दणाणून गेला. सरकारी व निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी राज्यभर संपाची हाक दिली आहे. यात लांजा तालुक्यातील १५०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. संपाबाबत माहित नव्हते त्या सामान्य नागरिकांना या भर उन्हात हेलपाटे पडले. मंगळवारी सकाळी लांजा तहसीलदार कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली आणि ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ मिळालीच पाहिजे यासाठी घोषणा दिल्या. या संपात महिला कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता. यामध्ये राज्य सरकारी, जिल्हा परिषद निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, समन्वय समिती महाराष्ट्रमार्फत राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी झाले होते. त्यामध्ये समन्वय समितीचे अध्यक्ष महादेव चव्हाण, सरचिटणीस सचिन निकम, उपाध्यक्ष रोहिदास राठोड, कार्याध्यक्ष प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक कर्मचारी कडक उन्हाचा विचार न करता सहभागी झाले होते.