रत्नागिरी - संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी - संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट
रत्नागिरी - संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट

रत्नागिरी - संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट

sakal_logo
By

८९०४२


शासकीय कार्यालयात शुकशुकाट
२० हजार कर्मचारी संपात सहभागी; शासकीय कामे ठप्प; नागरिकांची पायपीट
रत्नागिरी, ता. १५ ः एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत आज बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सुमारे २० हजार कर्मचारी संपात सामील झाले. संपाचा शासकीय कामावर मोठा परिणाम होऊन ती ठप्प झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आदी कार्यालयामध्ये पूर्णतः शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही भागात बंद ठेवला होता. संपामुळे अनेक नागरिकांना रिकाम्या पावलांनी परत जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ वाहतूक कोंडी झाली; परंतु पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवले.
सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अन्य क्षेत्रातील २० हजार कर्मचारी जिल्हाभरात राज्यव्यापी संपामध्ये सहभागी झाले. सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हळूहळू शासकीय कर्मचारी गोळा होत गेले. १२ वाजेपर्यंत ही संख्या काही हजारात गेली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली. एकच मिशन जुनी पेन्शन, असा स्लोगन असलेले टी शर्ट, टोप्या घालून कर्मचारी संपात सामील झाले. जुनी पेन्शन लागू करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी आजपासून हे कर्मचारी संपात उतरले आहेत.
विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी २००५ मध्ये बंद झालेली ही जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आपली मते व्यक्त केली. गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली. अखेर वाहतूक पोलिस, शहर पोलिस आणि स्वयंसेवक यांनी संपकऱ्यांना एका बाजूला करून वाहतूक कोंडी सोडवली. संप यशस्वी करण्यासाठी सर्व संघटनेच्या समन्वयकांची यापूर्वीच बैठक झाली. नियोजनानुसार आजचा संप संघटनांनी शंभर टक्के यशस्वी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकारी वगळता सर्व कर्मचारी या संपात उतरले होते. सामान्य प्रशासन, जिल्हा पुरवठा, चिटणीस शाखा, पालिका विभाग आदी विभाग रिकामे होते. जिल्हा परिषदेमध्येही तीच अवस्था होती. कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले.


दोन्ही संघटना एकत्र
लेखा कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब महासंघाने पाठिंबा दिल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेत १०० टक्के संप यशस्वी झाला. यापूर्वी दोन्ही संघटना स्वतंत्रपणे विविध प्रश्‍नांवर लढत होत्या; परंतु जुनी पेन्शन हा प्रश्‍न महत्त्वाचा असल्याने या संघटनांनी संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे लेखा संघटनेचे राजू जाधव आणि नितीन तांबे यांनी सांगितले.


जिल्ह्यात आज संप शंभर टक्के यशस्वी झाला. आज संध्याकाळपर्यंत तरी शासनाकडून चर्चेसंदर्भात बोलावणे आले नव्हते. त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस हा संप चालण्याची शक्यता आहे.
- सुरेंद्र भोजे, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष