पान एक-कसालमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-कसालमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू
पान एक-कसालमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

पान एक-कसालमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

sakal_logo
By

पान एक

89143


कसालमध्ये तरुणाचा
संशयास्पद मृत्यू
बालमवाडीतील घटना ः संशयित ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः कसाल बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या सचिन श्रीकांत भोसले (वय ४१) यांचा मृतदेह आज कसाल-बालमवाडी येथील त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला. रात्री उशिरापर्यंत याबाबतचे कारण नेमके स्पष्ट झाले नसले तरी नागरिकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे समजते. ही घटना रविवारी (ता. १२) रात्री घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मृतदेहाचे विच्छेदन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकणार आहे. पोलिसांनी मात्र आपल्या तपासाचा वेग वाढविला आहे.
कसाल बाजारपेठेत कसाल पोलिस दूरक्षेत्राच्या बाजूला गेले कित्येक वर्षे सचिन भोसले यांचा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय होता. मोबाईलमधील असलेली जाण आणि ग्राहकांशी मनमिळाऊपणामुळे सचिन परिचित होते. मात्र, आज सकाळी ते राहत असलेल्या घरात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सचिन हे आपल्या घरात एकटेच राहत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. सचिन हे अविवाहित होते. व्यवसायामुळे उशिरापर्यंत त्यांना दुकानात थांबावे लागत होते. यामुळे वृद्ध वडिलांची काळजी घेणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे वडील त्यांच्या बहिणीकडे राहत होते. या घरात एका खोलीमध्ये सचिन स्वतः आणि दुसऱ्या खोलीमध्ये त्यांचा भाऊ असे वेगवेगळे राहत असत.
आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्यानुसार सचिन रविवारी सायंकाळी दिसले होते; मात्र सोमवार (ता.१३) सकाळपासून त्यांचे घर बंद होते. त्यांची मोटारसायकल बाहेर अंगणात उभी होती. सोमवार असला की सचिन कधीकधी खरेदीसाठी कोल्हापूर किंवा अन्य शहरात जात असत. त्यामुळे ते कोल्हापूरला खरेदीला गेले असतील, असे शेजारच्या लोकांना वाटले होते. सचिन आपल्या मूळ गावी मालवण राजकोट येथे दर सोमवारी घरी दिवा लावण्यासाठी जात असत; मात्र या सोमवारी ते तिथे गेले नाहीत. आज सकाळीही त्यांचे घर बंदच दिसले. त्यावेळी शेजारी असलेल्या घरातील एका व्यक्तीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणताच प्रतिसाद मिळू शकला नाही. अखेर त्यांनी खिडकीतून वाकून बघितले असता सचिन रक्ताच्या थारोळ्यात दिसले. शेजाऱ्यांनी लागलीच ओरस येथे राहत असलेले सचिनच्या नातेवाईकास बोलवून घेतले. पोलिसांनी दुसरा भाऊ राहत असलेल्या खोलीतून सचिनच्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरवाजाने आत जाऊन पाहिले असता सचिन मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनच्या अंगावर कोणतीही मारहाणीची जखम आढळलेली नाही; मात्र त्याच्या नाकातून आणि कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झालेला होता आणि ही घटना रविवारी रात्रीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. सिंधुदुर्गनगरी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयंत वारा, विवेक नागरगोजे, श्री. गोसावी, पोलिस नाईक अश्विनी भोसले, होमगार्ड रामदास तावडे आदींनी घटनास्थळी येत घटनास्थळाचा पंचनामा केला. सचिन याच्या भावासह काही जणांचे जबाबही घेतले आहेत. दरम्यान, पोलिसांनाही घातपाताचा संशय आला आहे. त्या अनुषंगाने एका नातेवाईकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते; मात्र पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही. या घटनेची खबर मिळताच कसाल सरपंच राजन परब, पंचायत समिती माजी सदस्य गोपाळ हरमलकर, ग्रामपंचायत सदस्य तृप्ती नारकर, गणपत कसालकर, मिलिंद सावंत यांच्यासह अनेक लोकांनी सचिनच्या घराजवळ गर्दी केली होती. सचिन यांच्या पश्चात वृद्ध वडील, एक भाऊ आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.