
सायबर गुन्हेगारीबाबत देवगडमध्ये जनजागृती
८८९७३
देवगड ः येथील बसस्थानकावर पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सायबर गुन्हेगारीबाबत देवगडमध्ये जनजागृती
देवगड ः अलीकडे वाढत चाललेल्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथील पोलिसांकडून समाजात जनजागृती सुरू आहे. स्थानिक नागरिक, व्यावसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत आवाहन करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्यासह त्यांचे पथक जनजागृती मोहीम राबवित असल्याचे सांगण्यात आले. अलीकडे सायबर गुन्हेगारीचे प्रस्थ वाढत आहे. अज्ञातांकडून फसवणुकीसाठी नवनवे मार्ग अवलंबिले जात आहेत. यातून फसवणुकीचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम येथील पोलिस राबवित आहेत. स्थानिक नागरिकांबरोबरच रिक्षा व्यावसायिक, येथील बसस्थानक परिसर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेविषयी पोलिस निरीक्षक बगळे यांनी माहिती दिली. यामध्ये हवालदार एफ. जी. आगा यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
सिंधुदुर्गात ३० ला राष्ट्रीय लोकअदालत
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने २०२३ या वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत ३० एप्रिलला आयोजित केली आहे. वादपूर्व प्रकरणे ज्यामध्ये पाणीपट्टी थकबाकी, घरपट्टी थकबाकी, बँक, वित्तीय संस्था यांनी दिलेल्या कर्जाची थकबाकी, वीजबिल थकबाकीची प्रकरणे न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वी निकाली काढण्यासाठी या राष्ट्रीयलोक अदालतीमध्ये ठेवून लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा विधि सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी केले आहे.
---
‘विहिंप’तर्फे शनिवारी सावंतवाडीत बैठक
सावंतवाडी ः शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, विविध संप्रदाय, मठ-मंदिरांचे पदाधिकारी, वारकरी मंडळी, तरुण मंडळे, विविध उत्सव साजरे करणारी मंडळे यांनी एकत्र येऊन श्रीराम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजन बैठक शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाला येथील नारायण मंदिर येथे आयोजित केली आहे. या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.