
‘उत्कर्ष’ शिक्षक पुरस्कारांचे उद्या कुडाळमध्ये वितरण
‘उत्कर्ष’ शिक्षक पुरस्कारांचे
उद्या कुडाळमध्ये वितरण
कुडाळ, ता. १५ ः जिल्ह्यातील शिक्षकांना त्यांनी केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून ‘उत्कर्ष शिक्षक पुरस्कार २०२२’चे वितरण शुक्रवारी (ता. १७) येथील मराठा समाज सभागृहात करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये आदर्श शाळा, जीवन गौरव, उत्कृष्ट शिक्षक, रायझिंग स्टार आदी पुरस्कार शिक्षक व शाळांना देण्यात येणार आहेत. तसेच २०२२ मध्ये आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार असून तेच आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. शिक्षकांनी केलेल्या सर्व सामाजिक कार्याची आणि उत्तम शैक्षणिक कामाची दखल घेऊन शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजाप्रती करत असलेल्या कामगिरीसाठी सीता दळवी आणि त्यांचे पती रामचंद्र दळवी यांच्याद्वारे सुरू केलेल्या एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनच्यावतीने ‘उत्कर्ष शिक्षक पुरस्कार २०२२’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी (सिंधुदुर्ग) महेश धोत्रे, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, एस. आर. दळवी (आय) फाउंडेशन संस्थापक रामचंद्र दळवी, सीता दळवी आदी उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यामध्ये सर्व शिक्षकांसाठी आदित्य बिर्ला ग्रुपतर्फे अल्पा शहा या ‘फायनान्शल लिटरशी’ या विषयावर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्याचे प्रमाणपत्रही शिक्षकांना देण्यात येणार आहे. ‘चॅट जीपीटी’ विषयावर डॉ. नयन भेडा यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.