पेन्शनसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेन्शनसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या
पेन्शनसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या

पेन्शनसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या

sakal_logo
By

८९२५२
सिंधुदुर्गनगरी ः संपात सहभागी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.


पेन्शनसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या

कर्मचाऱ्यांचे आंदोलन; संघटनांचा संपात उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः जुनी पेन्शन मिळालीच पहिजे, या मागणीसाठी बेमुदत संपात सहभागी झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आजच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना एकत्र आल्या असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी मोठ्या संखेने सहभागी झाले आहेत. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रात शिक्षकांच्या व्यथा विधानसभेत मांडण्यासाठी शिक्षक आमदार असू शकतो, तर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आमदार का असू नये, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच यावेळी जुनी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी जसे सर्व कर्मचारी, संघटना एकवटल्या आहेत, तसेच शिक्षक आमदारप्रमाणेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आमचाही आमदार असावा, या मागणीसाठी एकत्र येऊया, असे जिल्हा परिषद लेखा संघटना राज्य उपाध्यक्ष राजेश नाईक यांनी यावेळी आवाहन केले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी विविध संघटनांची एकजूट महत्त्वाची असून त्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. तर आंदोलनासाठी एकत्र आलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व संघटनांचा समावेश असलेली समन्वय समिती गठीत केली.
................
कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज अधोरेखित
कालपासून राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने बेमुदत संप पुकारला असून या संपात सुमारे ९८ टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. संप काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळेच कार्यालये उघडलेली दिसत आहेत. अन्यथा प्रशासनाला कार्यालयाचे दरवाजे बंद करण्याची वेळ आली असती. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटींमुळेच जिल्ह्यात आरोग्यसेवा सुरू आहे. यानिमित्ताने आरोग्य यंत्रणेसह अन्य कार्यालयांतील कंत्राटींची गरज अधोरेखित झाली.
---
आरोग्यसेवा अखंडित
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या संपात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह आरोग्य यंत्रणेतील नियमित आरोग्य कर्मचारीही सहभागी झाले आहेत. असे असले तरी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे आरोग्यसेवा अखंडित सुरू आहे. नियमित कर्मचारी संपात असल्याने कार्यरत यंत्रणेवर ताण येत असला तरी आरोग्यसेवा खंडित झालेली नाही, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाने दिली.