
संक्षिप्त-सावंतवाडी, मालवणात संवाद शाळेचे आयोजन
संक्षिप्त
सावंतवाडी, मालवणात
संवाद शाळेचे आयोजन
सावंतवाडी ः बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत आणि फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच यांच्यावतीने एक दिवसीय संविधान संवाद शाळेचे आयोजन सावंतवाडी येथे २५ मार्चला, तर मालवण येथे २६ मार्चला केले आहे. यावेळी संवादक म्हणून लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र सचिव राजवैभव शोभा रामचंद्र उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिर येथे, तर मालवणमध्ये बॅ. नाथ पै सेवांगण येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. यात १८ वर्षांवरील मुलांनी सहभाग घेणे गरजेचे आहे. प्रवेश नि:शुल्क असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे. सेवांगण तर्फे प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. पूर्वनोंदणीसाठी उद्यापर्यंत (ता. १६) सावंतवाडीकरिता संदीप निंबाळकर, मालवणसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. प्रशांत पाटील
संमेलनाध्यक्षपदी
कणकवली ः अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोकण प्रदेशांतर्गत पालघर तालुका शाखा आयोजित सातव्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी लेखक डॉ. प्रशांत पाटील यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखक सुधीर दांडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. हे संमेलन रविवारी (ता. १९) पालघर बोईसर येथील स्व. किशोर संखे हॉल येथे दुपारी २ वाजता होणार असल्याची माहिती परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष तथा प्रतिथयश साहित्यिक व सिंधुदुर्गचे सुपुत्र डॉ. अ. ना. रसनकुटे यांनी दिली. पालघर तालुका सचिव भुपेंद्र संखे संमेलनाचे उद्घाटक असून प्रसिद्ध कवी अशोक पवार विशेष पाहुणे असणार आहेत. साहित्य संमेलनाच्या काव्यसंमेलनात सहभागी होऊ इच्छिणार्या कवींनी आपली कविता १८ मार्चपर्यंत पाठवावी, असे आवाहन डॉ. रसनकुटे यांनी केले.