
देवगडात ढगाळ वातावरणामुळे मच्छीमार, बागायतदारांत चिंता
देवगडमध्ये ढगाळ वातावरणामुळे चिंता
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः तालुक्याच्या किनारी भागात ढगाळ वातावरण होते. पहाटेला धुके पसरले होते. दिवसभर वातावरणातील उकाडा वाढला होता. संभाव्य पावसाच्या शक्यतेने आंबा, काजू बागायतदारांस मच्छीमारही धास्तावले आहेत.
मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त माहितीनुसार जिल्ह्याच्या काही भागांत १५ ते १७ या कालावधीत तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची तसेच सुमारे ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्यावतीने दक्षता घेण्याचे आवाहन करणारा संदेश दिला आहे. त्यामुळे सावधानता बाळगली जात आहे. त्यातच गेले दोन दिवस किनारी भागातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. पहाटेच्यावेळी धुके पसरलेले असते. आजही पहाटेच्या सुमारास सकाळपर्यंत धुके पसरले होते. सकाळच्यावेळी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर उकाडा जाणवू लागला. वातावरणात बदल झाल्याने संभाव्य पावसाच्या शक्येतेने आंबा, काजू बागायतदारांसह मच्छीमार चिंतेत आहेत. आता हापुस हंगाम सुरू होत आहे. त्यातच वादळी पाऊस झाल्यास आंबा पिकाला धोका पोचण्याची शक्यता बागायतदार व्यक्त करीत आहेत. मच्छीमारही पावसाचा अंदाज घेत मच्छीमारी करीत आहेत. एकूणच बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदारांसह शेतकरी, मच्छीमारांमध्ये अस्वस्थता आहे.