
कसालमध्ये आरोग्य शिबिराचा ११० पोलिस कर्मचाऱ्यांना लाभ
८९२७८
कसालमध्ये आरोग्य शिबिराचा
११० पोलिस कर्मचाऱ्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करून घ्यावी. अनेक वर्षे सेवा केल्यानंतर वयोमानानुसार निवृत्त झाल्यावर स्वतःच्या आरोग्याकडे, शरीराकडे लक्ष द्या. सेवानिवृत्त झालो म्हणून घरीच न बसता कामात व्यस्त राहा. रोज सकाळी व्यायाम करा, असे मार्गदर्शन आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दयानंद गवस यांनी उपस्थित सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना केले.
कसाल-बालमवाडी येथील साई माउली ब्रॅक्वेट हॉल येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या आरोग्य तपासणी शिबिरात ११० कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्तगट, नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. नंतर शिबिरात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. डॉ. स्वप्नील राणे, डॉ. धनंजय रासम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष गोविंद वारंग, कार्याध्यक्ष अर्जुन राणे, खजिनदार उमाकांत पालव, यशवंत डिंगणेकर, डॉ. रोहित डगरे आदींसह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राज्य संघटनेच्या सूचनेनुसार असोसिएशनची २५ सदस्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. वर्षातून एक-दोन वेळा कौटुंबिक व आरोग्य शिबिरे भरविण्यात येणार असल्याचे पालव यांनी सांगितले.