
गुहागरच्या शहर विकास आराखड्याला स्थगिती मिळणार
rat15p4.jpg-
89198
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत किरण खरे व नीलेश सुर्वे.
गुहागर विकास आराखड्याला स्थगिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय ; भाजपकडून आनंद
गुहागर, ता. १५ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागरच्या शहर विकास आराखड्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय समजताच मुंबईत दिवसभर विविध नेत्यांच्या भेटी घेणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद साजरा केला.
हा निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्याच्या दालनात राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष किरण खरे व तालुकाप्रमुख नीलेश सुर्वे उपस्थित होते. त्याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांना गुहागर शहर विकास आराखड्यामधील अनेक त्रुटी दाखवून देण्यात आल्या. जवळपास पाऊणतास ही चर्चा सुरू होती. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची भेट घेतली. त्या भेटीतही शहर विकास आराखड्यामधील त्रुटी पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिल्या. त्यानंतर पालकमंत्री सामंत यांची भेट घेण्यात आली. सुमारे अर्ध्या तासाच्या बैठकीत शहर विकास आराखडा गुहागरमधील स्थानिक जनतेला कसा उद्ध्वस्त करणारा आहे हे त्यांना पटवून दिले. या भेटीनंतर सामंत यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे व तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान बांधकाममंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कार्यालयातून मुख्यमंत्री शिंदेंपर्यंत हा सर्व विषय पोचला होता. या सर्व घडामोडींमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर झालेल्या काही मिनिटांच्या भेटीतच त्यांनी या आराखड्याला स्थगिती देण्याबाबत पत्र तयार करण्यास सांगितले. गुहागर शहर विकास आराखडा रद्द व्हावा म्हणून सोमवारी (ता. १३) गुहागर नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी सामंत यांची भेट घेतली होती.
चौकट
मंत्रालयात मांडले ठाण
मंगळवारी (ता. १४) भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, जिल्हा माध्यम संयोजक शादुर्ल भावे, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, शहराध्यक्ष संगम मोरे, नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते उमेश भोसले, नगरसेवक समीर घाणेकर, गजानन वेल्हाळ, भाजयुमोचे शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, भाजप कार्यकर्ते हेमंत बारटक्के, अतुल फडके, प्रथमेश दामले यांनी मंत्रालयात ठाण मांडले होते.
कोट
हा विजय गुहागर शहरवासीयांनी एकजुटीने उभ्या केलेल्या लढ्याचा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जनभावनांचा आदर केला. याबद्दल संपूर्ण गुहागर शहरवासीयांतर्फे त्यांचे आभार मानतो.
- नीलेश सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष