रत्नागिरी शहरातील बंद सिग्नल यंत्रणेवर साडेतेरा लाख खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी शहरातील बंद सिग्नल यंत्रणेवर साडेतेरा लाख खर्च
रत्नागिरी शहरातील बंद सिग्नल यंत्रणेवर साडेतेरा लाख खर्च

रत्नागिरी शहरातील बंद सिग्नल यंत्रणेवर साडेतेरा लाख खर्च

sakal_logo
By

बंद सिग्नलवर १३.५० लाख खर्च
रत्नागिरी शहरः माहितीच्या अधिकाराखाली उघड ; जनतेच्या पैशाची उधळपट्टी
रत्नागिरी, ता. १५ ः शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम सिग्नल यंत्रणा करते; परंतु गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून ही सिग्नल व्यवस्था ठप्प आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे काम वाढले आहे. ही वस्तुस्थिती असताना पालिकेने या बंद सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीवर ३ वर्षांमध्ये सुमारे साडेतेरा लाख रुपये खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमध्ये हे स्पष्ट झाले आहे.
ही जनतेच्या पैशाची लूट असल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियावर केला आहे. रत्नागिरी शहराची सिग्नल यंत्रणा पालिकेच्या मालकीची आहे; मात्र गेल्या पाच वर्षांपासून ही व्यवस्था कुचकामी ठरत आहे. वारंवार ती नादुरुस्त होऊन कोणताही सिग्नल सुरू राहात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत होता. त्यामुळे दुरुस्तीसाठी ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली. त्यानंतर मारूती मंदिर आणि जेलनाका येथील दोन सिग्नल सुरू ठेवले होते. बाकी सर्व सिग्नल अनेक वर्षांपासून बंद आहेत तरी बंद सिग्नल यंत्रणेवर २०१८ पासून २०२१ पर्यंत साडेतेरा लाख खर्च करण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली पुढे आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय जैन यांनी जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबावा यासाठी या विषयात हात घातला आहे. त्यांनी २०१५ पासून सिग्नल यंत्रणेवर झालेल्या खर्चाची माहिती मागवली होती; परंतु पालिकेने २०१८ ते २१ पर्यंत झालेल्या खर्चाचा तपशील दिला आहे.
शहरात मारूती मंदिर, जेलनाका, जयस्तंभ, रामआळी, गोखलेनाका, लक्ष्मीचौक या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. शहरातील वाहतूककोंडी सुटावी यासाठी ही यंत्रणा आहे; मात्र वारंवार या यंत्रणेमध्ये बिघाड आल्याने मारूती मंदिर आणि जयस्तंभ वगळता अनेक वर्षांपासून उर्वरित सिग्नल बंद आहेत. त्यात सुरू असलेले हे दोन्ही सिग्नल पाणीयोजना आणि गॅसलाईन टाकताना बंद ठेवण्यात आली ती बंदच आहे. या बंद सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीवर पालिका दरवर्षी सुमारे अडीच ते साडेतीन लाख रुपये खर्च करत आहे. त्यासाठी एजन्सी नेमल्याचे सांगण्यात येते. मग बंद यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च म्हणजे जनतेच्या पैशाची लूटच नाही का, असा सवाल जैन यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही. पालिकेच्या इलेक्ट्रिशियनशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी एजन्सी नेमली आहे. त्या एजन्सीला दरवर्षी अडीच ते साडेतीन लाख रुपये दिले जातात.यंत्रणा बंद असेल तर तिच्या देखभाल दुरुस्तीचा संबंध काय? या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. पालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांमध्ये बंद सिग्नल यंत्रणेवर हा पैसा विनाकारण खर्च केल्याचे जैन यांचे म्हणणे आहे.

------------------
चौकट
89340
सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीवर झालेला खर्च
२०१८-१९ मध्ये - ३ लाख ७३ हजार खर्च
२०१९-२० मध्ये ३ लाख ४३ हजार (सर्व सिग्नल)
२०१९-२० मध्ये २ लाख १३ हजार (जयस्तंभ सिग्नलवर)
२०२०-२१ मध्ये ४ लाख २४ हजार
----------------
कोट
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यांनी शहरातील रस्त्यांवरही पांढरे पट्टे मारून घेतले आहेत. सिग्नल यंत्रणा सुरू व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला होता. आता ५१ लाख रुपये नवीन सिग्नल यंत्रणेला मंजूर झाले आहेत. पालिकेने आता चांगल्या पद्धतीने हे काम करून घ्यावे. सिग्नल यंत्रणा असेल तर वाहतूककोंडी होत नाही. सिग्नल यंत्रणा बंद ठेवावी, असे आम्ही सांगण्याचा संबंधच नाही.
- दत्तात्रय शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा