खासदार राऊत हॅटट्रिक साधतील

खासदार राऊत हॅटट्रिक साधतील

89344
सिंधुदुर्गनगरी : वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार विनायक राऊत. शेजारी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार दगडू सकपाळ, अण्णा केसरकर, अतुल रावराणे, सतीश सावंत, संजय पडते आदी.


खासदार राऊत हॅटट्रिक साधतील

शिवसैनिकांचा विश्‍वास; सिंधुदुर्गनगरीत वाढदिवसानिमित्त निष्ठावंतांचा सत्कार

ओरोस, ता. १५ ः जिल्ह्यातील दहशदवाद संपविण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्याकडे दिली. त्यांनी ती लीलया पेलली. २०१४ मध्ये दीड लाख मतांनी ते निवडून आले. तर २०१९ मध्ये त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आले. २०२४ मध्ये ते तीन लाख मताधिक्याने निवडून येतील आणि विजयाची हॅटट्रिक साधतील, असा विश्वास तथा शुभेच्छा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांना ६९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिल्या. यानिमित्त जिल्ह्यातील ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आज आयोजित कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार दगडू सकपाळ, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर, नागेंद्र परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अभय शिरसाट, अतुल रावराणे, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, नीलम पालव, शैलेश परब, नगरसेवक बाळा नर आदी उपस्थित होते. यावेळी महिला शिवसेनेच्यावतीने खासदार राऊत यांना ओवाळण्यात आले. युवासेनेच्या वतीने हापूस आंब्याची माळ घालून अभिनंदन करण्यात आले. अभिष्टचिंतन करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी, बॅ. नाथ पै यांची ओळख कायम ठेवण्याचे काम खासदार राऊत करीत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत गरिबांचे खासदार म्हणून त्यांना ओळखले जाते, असे सांगितले. माजी आमदार सकपाळ यांनी, सगळेजण म्हणतात शिवसेना फुटली; पण शिवसेना फुटलेली नाही. कोकणात शिवसेना आहे, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. शिवसैनिक आणि कोकणी माणूस पाठीमागे आहे, तोपर्यंत शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. अतुल रावराणे यांनी खासदार राऊत यांनी पक्षाला गरज असताना पाठीशी उभे राहणारे राऊत शिवसेना पुन्हा वाढविण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत, असे सांगितले. जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी, आता जबाबदारी वाढली आहे. पुढील वर्षी खासदार राऊत ७० वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यावेळी जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांवर भगवा फडकवूया, असे आवाहन केले. संदेश पारकर यांनी जिल्ह्याच्या जडणघडणीत राऊत यांचे योगदान आहे. त्यांनी निवडून येत विकासाचे व्रत घेतले असल्याचे सांगितले. संजय पडते यांनी खासदार राऊत यांच्याकडे जाणारे कार्यकर्ते नेहमी हसत बाहेर पडतात. ते सुखदुःखात नेहमी सहभागी होतात. शिवसेनेमुळे विकासकामे मंजूर झाली आहेत, हे जनतेला सांगूया, असे सांगितले. यावेळी उदय सर्पे यांनी खासदार राऊत यांच्यावर कविता सादर केली.
---
नाईक हे निष्ठावंत शिलेदार
सत्काराला उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले, ‘‘वाढदिवसानिमित्त हारतुरे घेण्याचा अधिकार बाळासाहेब यांचा आहे. आता उद्धव ठाकरे यांचा आहे. शिवसेना चोरता येईल; पण नामशेष करू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचाच कपाळमोक्ष होईल. मन चोरण्याचे धाडस कोणी करू शकत नाही. ‘खोके’पण करू शकत नाहीत. शिवसैनिकांच्या मनामनांत आमदार वैभव नाईक बसले आहेत. ते ‘मातोश्री’चे निष्ठावंत शिलेदार आहेत.’’
...............
गद्दारी केलेल्यांना जागा दाखवणार
आमदार नाईक म्हणाले, ‘‘तिसऱ्या वेळी खासदार होण्यापासून राऊत यांना कोणीही रोखू शकत नाही. त्यांच्यामुळे कोकणात शिवसेना पुन्हा रुजली. त्यांनी दहा वर्षांत प्रामाणिक कामाबरोबर विश्वासही संपादन केला. राज्यात शिवसेना फुटली तरी जिल्ह्यात शिवसेना भविष्यात सत्ता मिळविणार आहे. आम्ही गद्दारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने केसरकर, सामंत यांना पालकमंत्री केले; परंतु ते पक्ष सोडून गेले. पुढील निवडणुकीत त्यांना जागा दाखविली जाईल.’’
....................
वैभव नाईक यांनी स्वतः पद सोडले
खासदार राऊत तिसऱ्या वेळी निवडून येणार यात शंका नाही; पण झालेले काम आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे. चांगल्या कामाने विरोधकांना पराभूत करूया, असे आवाहन संपर्क प्रमुख दुधवडकर यांनी केले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा जोमाने राज्यात उभी करायची आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी स्वतःहून जिल्हाप्रमुख पद सोडले आहे. दुसऱ्याला संधी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे संजय पडते यांना जिल्हाप्रमुख केले, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com