काजू पिकावर संशोधन व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काजू पिकावर संशोधन व्हावे
काजू पिकावर संशोधन व्हावे

काजू पिकावर संशोधन व्हावे

sakal_logo
By

89342
सांगुळवाडी ः परिसंवादात शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
89343
सांगुळवाडी ः येथील कृषी महाविद्यालयात मांडण्यात आलेले गावठी काजू बीचे प्रदर्शन.


काजू पिकावर संशोधन व्हावे

शेतकऱ्यांची मागणी; सांगुळवाडीत चर्चासत्र, बी प्रदर्शनास प्रतिसाद

वैभववाडी, ता. १५ ः शाश्वत उत्पन मिळवून देणारे काजू पीक बदलत्या वातावरणामुळे संकटात सापडल्याचे चित्र गेल्या चार-पाच वर्षांत दिसून येत आहे. त्यामुळे त्याअनुषंगाने काजू पिकावर संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत बहुतांशी शेतकऱ्यांनी येथे व्यक्त केले.
फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, सांगुळवाडी कृषी महाविद्यालय आणि कृषी विभाग, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगुळवाडी कृषी महाविद्यालय येथे काजू पीक विषयावर जिल्हास्तरीय चर्चासत्र आणि काजू बी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. आर. टी. भिंगार्डे, संदीप पाटील, डॉ. विजय देसाई, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, प्रा. तेजस गायकवाड, प्रा. विवेक कदम, महेश रावराणे आदी उपस्थित होते.
काजू उत्पादक शेतकरी विलास देसाई, जयसिंग काळे यांनी बदलत्या वातावरणाचा काजू पिकावर होणाऱ्या परिणामाचा मुद्दा चर्चेदरम्यान उपस्थित केला. अवकाळी पाऊस, गारपीट, सतत ढगाळ वातावरण आणि त्यामुळे वाढणाऱ्या किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे काजू बागायतदार चार-पाच वर्षांत हतबल आहे. यासंदर्भात संशोधन होणे आवश्यक आहे. काजू पीक लागवड आणि व्यवस्थापनात कोणते बदल केले पाहिजेत, यावर विचारमंथन होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रानमोडीचा उपद्रव वाढत असून त्याबाबत विद्यापीठ पातळीवर रानमोडी नष्ट करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत. बदलत्या वातावरणाचा गावठी काजूवर तितकासा परिणाम होत नाही. काही झाडांच्या काजू बीचा आकार वेंगुर्ला-७ पेक्षा मोठा आहे. त्यामुळे त्यासंदर्भातील लागवड करता येण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. काजूच्या झाडाखाली पडणाऱ्या पालापाचोळ्यामुळे काजू बी निवडताना अडचण येते. शासनाच्या यांत्रिकीकरणांतर्गत ब्लोअर हवेचा मारा करून पालापाचोळा बाजूला करण्याच्या यंत्राचा समावेश करावा, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. खापरे, डॉ. देशमुख, डॉ. देसाई यांनी शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या आणि प्रश्नांची उत्तरे दिली. वातावरणातील बदल हे सर्वमान्य आहे; परंतु त्यावर काय करता येईल, याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्र डॉ. बाळासाहेब विद्यापीठाने तयार केले असून लवकरच ते उपलब्ध होईल, असे चर्चेदरम्यान सांगितले.