
राजापूर ते धारतळे रस्त्यासाठी निधी मंजूर
rat१६२२.txt
राजापूर ते धारतळे रस्त्यासाठी निधी मंजूर
डांबरीकरणाला सुरवात ः धारतळे ते गावखडी मार्ग कधी होणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः तालुक्यातील राजापूर ते धारतळे या रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे वाहनचालक व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
राजापूर ते धारतळे व पुढे धारतळे ते गावखडी दरम्यानच्या सागरी महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धारतळे ते गावखडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गतवर्षीच वर्कऑर्डर देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही या कामाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांसह वाहनचालकांमध्ये संतापाची भावना आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बांधकाम विभागावर धडक देत याबाबत जाबही विचारला होता. त्या वेळी १५ मार्चपासून कामाला सुरवात होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे; मात्र अद्यापही कामाला सुरवात झालेली नव्हती. राजापूर ते धारतळे मुसाकाझी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, नुकतीच या कामाची निविदा प्रकिया पूर्ण होऊन तत्काळ कामाला सुरवातही करण्यात आली. माजी आमदार खलिफे यांनी राजापूर ते धारतळे मुसाकाझी या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी निधी मिळावा याकरिता पाठपुरावा केला होता. त्याला यश येताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली होती. आता हे काम मार्गी लागत असल्याने प्रवासी व वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.