
रत्नागिरी ः 375 पिडीत महिलांना ‘सखी’ चा आधार
चित्र KOP२०J९३८९४
३७५ पीडित महिलांना ‘सखी’ चा आधार
दोन वर्षातील कामगिरी ; १४ लोकांचा कर्मचारी २४ तास कार्यरत
रत्नागिरी, ता. १६ ः विविध कारणांनी पीडित असलेल्या महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटरचा आधार महत्वाचा ठरत आहे. स्थापनेनंतर दोन वर्षात जिल्ह्यातील ३७५ पीडित महिलांना या केंद्राने आधार दिला आहे.
सखी सेंटरतर्फे महिलादिनी दाभोळ येथे कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी भाकर सेवा संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, पॅरा लिगल ऑफिसर नंदा चौगुले यांनी महिला दिनाविषयी माहिती सांगितली. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात. अत्याचारग्रस्त महिलांचे हिंसेपासून तत्काळ संरक्षण होण्यासाठी त्यांना एकाच छताखाली मानसिक आधार व समुपदेशन, कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन, तत्काळ वैद्यकीय सेवा, पोलिस सेवा तसेच पीडित महिलेस गरज भासल्यास पाच दिवस निवार्याची सोय आदी सेवा पुरवल्या जातात.
रत्नागिरीत सुरू असलेल्या सखी सेंटरच्या माध्यमातून रत्नागिरीतील पीडित महिलांना आधार देण्यासाठी व तत्काळ मदत होण्यासाठी १४ लोकांचा कर्मचारी वर्ग २४ तास कार्यरत आहे. त्यात १ केंद्र प्रशासक, २ केसवर्कर, १ समुपदेशक, १ पॅरालिगल ऑफिसर, १ पोलिस सुलभता अधिकारी, २ पॅरामेडिकल ऑफिसर, १ आयटी स्टाफ, ४ सुरक्षा रक्षक व १ बहुद्देशीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ३७५ पीडित महिलांनी सेवेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी काही प्रकरणे ही अगदी अटीतटीला पोचलेली होती. सखी सेंटरमध्ये आल्यानंतर त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन ते सुखाने नांदत आहेत. या केंद्रामार्फत आतापर्यंत १३९ केसेस निवार्यासाठी दाखल झाल्या असून, त्यांनी येथे माहेरपणही अनुभवले. समुपदेशनासाठी १८९ केसेस, पोलिस सहत्यातेसाठीची ११७ प्रकरणे व कायदेविषयक साहाय्य १०९ केसेस असून वैद्यकीय मदत लाभलेल्या ११६ केसेस आहेत. ज्या केसेसची मानसिक स्थिती चांगली नव्हती अशा महिलांना त्यांची शुश्रूषा करून जिल्हा मनोरुग्णालयात येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. काही महिलांना त्यांच्या घरचांच्या ताब्यात सुपूर्द केले तसेच काही महिलांना प्रतिभा महिलाश्रम व आजी-आजोबांचा गाव (वृद्धाश्रम) येथे पुढील निवासासाठी नेऊन सोडण्यात आले.
-----
चौकट
१५०हून जनजागृती कार्यक्रम
सखी सेंटर या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, झोपडपट्टी, ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, आरोग्य केंद्रे, बाजारपेठा, महिला बचतगट अशा १५०हून अधिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतले तसेच पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त देशातील ७८० सखी सेंटरची पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात रत्नागिरी सखीला देशपातळीवर द्वितीय क्रमांक मिळाला आणि त्याचे बक्षीस वितरण दिल्ली येथे झाले.